Join us

सहा दिवसांत स्वाइनचे १२ बळी

By admin | Published: November 02, 2015 2:48 AM

जुलै महिन्यात मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्या पाठोपाठ हळूहळू राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसली

मुंबई: जुलै महिन्यात मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्या पाठोपाठ हळूहळू राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसली. आॅक्टोबर महिन्यात मुंबईत तुलनेने स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी आढळले, पण राज्यात २५ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत १२ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून, त्यात पुण्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. पाऊस कमी पडूनही मुंबईत स्वाइन फ्लूची साथ पसरली होती. आॅगस्ट महिन्यापासून राज्यात स्वाइनचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सप्टेंबरपासून मुंबईत स्वाइनच्या रुग्णांचे प्रमाण घटले. मात्र, राज्यभरात स्वाइनचे रुग्ण आढळून येतच होते. हिवाळा सुरू होण्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे हवामान बदलताना आणि थंडीच्या दिवसांत सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. २०१२ मध्ये पुण्यात स्वाइन फ्लूची साथ पसरली होती. त्यानंतर स्वाइनचे रुग्ण आटोक्यात आले होते, पण गेल्या सहा दिवसांत पुण्यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षभरात प्रत्येक ऋतू बदलाच्या काळात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसून आली आहे. आॅक्टोबर महिना संपताना थंडीची चाहूल लागली आहे. या काळात रुग्णांमध्ये थोडी वाढ दिसून आली आहे. पण थंडी पडलेली नाही, त्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होईल की नाही? हे सांगता येत नाही. असे असले तरीही सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून औषधे घ्या, स्वत:च ठरवून कोणतीही औषधे घेऊ नका. स्वाइन फ्लूच्या बाबतीत हलगर्जी टाळा, असे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.