Join us

अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूचे ६१ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:33 AM

राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढत असून, अडीच महिन्यांत तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात स्वाइन फ्लूचे ८४९ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई  - राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढत असून, अडीच महिन्यांत तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात स्वाइन फ्लूचे ८४९ रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक नाशिकमध्ये १५, नागपूरमध्ये १४ आणि पुण्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.देशभरात स्वाइन फ्लूचा जोर वाढत असून राजस्थानमध्ये १७८ बळी गेले आहेत. स्वाइन फ्लूचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक वा मोफत इन्फ्लुएंजा लसीकरण होते.जीवनशैलीत झालेल्या चुकीच्या बदलांमुळे तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्यामुळे हा आजार बळावत असल्याचे राज्याच्या साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. आतापर्यंत १.२५ लाख रुग्णांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. आवटे यांनी दिली.जनजागृती सुरूस्वाइन फ्लूसंदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेयस्तरावर जनजागृती मोहीम घेणे, यात्रा, उत्सव, आठवडे बाजाराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण देणे आदी सर्वंकष कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जनजागृती करण्यात येत आहे.क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नवी मोहीमइंडियन मेडिकल असोसिएशनने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी ‘युनाइटटूएंडटीबी’ ही नवी मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून रुग्ण आणि डॉक्टर अशा दोन्ही स्तरांवर जागरूकता मोहीम हाती घेऊन उपचार आणि निदानाच्या पातळीवर लवकरात लवकर काम करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी दृकश्राव्य माध्यमातून प्रत्येक रुग्णाची नोंद तातडीने केली जाईल. ही नोंद वेब-आधारित मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे नोंदवण्याची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली आहे.क्षयरोगाची लक्षणे, बरे होणे व याविषयीचे गैरसमजयाबद्दल जागृती करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. असंख्य लोकांना या आजाराची लक्षणे माहीत नसल्याने त्याचे निदान सुरुवातीच्या काळात होण्यात अडचणी येतात, ही एक प्रमुख समस्या आहे. उपचार अर्धवट सोडणे, ही आणखी एक समस्या आहे. कारण, लक्षणांपासून बरे वाटू लागले की अनेक लोक उपचार सोडून देतात. यामुळे क्षयरोगाचे रुग्ण देशात वाढण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, असे निरीक्षण आयएमएने मांडले आहे. या धर्तीवर नव्या मोहिमेच्या माध्यमातून जागरूकतेचे काम करण्यात येणार आहे.या मोहिमेविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) मानद महासचिव डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी सांगितले की, डॉक्टर व रुग्ण यांनी या आजाराकडे गांभीर्याने पाहावे, हे यामागील उद्दिष्ट आहे. क्षयरोग संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपाय करणे गरजेचे आहे. मोहिमेअंतर्गत व्हिडीओचा प्रसार करण्यासाठी डॉक्टर, रुग्ण, रुग्णालये, आरोग्य संस्था, सरकारी यंत्रणा व विविध सोशल मीडिया यांचा आधार घेतला जाईल.

टॅग्स :स्वाईन फ्लूआरोग्य