Join us

भूमिपुत्राची कविता अभ्यासक्रमात

By admin | Published: June 24, 2017 12:57 AM

मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यासक्रम मंडळाने द्वितीय वर्ष कलावर्गासाठी आगरी, वाडवळी आणि मालवणी या बोलीतील साहित्यकृतीचा समावेश केला आहे.

प्राची सोनवणे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यासक्रम मंडळाने द्वितीय वर्ष कलावर्गासाठी आगरी, वाडवळी आणि मालवणी या बोलीतील साहित्यकृतीचा समावेश केला आहे. यामध्ये प्रसिद्ध आगरी कवी आणि कथाकारांच्या कविता आणि कथांचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईतील बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक विश्वास ठाकूर यांच्या आगरी बोलीतील कवितेचा समावेश या साहित्यात करण्यात आला आहे. ‘आमचेकरं आता परकल्प आयलंय’ ही कविता एसवाय बीएच्या अभ्यास क्रमासाठी निवडण्यात आली आहे.मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आगरी बोली भाषा प्राणपणाने जपली आहे. या परिसराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असली तरी स्थानिक रहिवासी आपल्या बोली भाषेलाच प्राधान्य देत आहेत. आगरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून स्थानिक कवी, लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे आगरी भाषेत लिहिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मोहन भोईर यांच्यासारख्या साहित्यप्रेमीने नवोदित कवी, लेखकांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना प्रोत्साहित करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये यापूर्वी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त व विद्यमान आरोग्य अधिकारी व पहिले आगरी गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह प्रकाश पाटील, गजानन पाटील, सर्वेश चरे, हास्य कलाकार संजीवन म्हात्रे यांनी आगरी भाषेतील कविता जनमानसात रुजविण्यास सुरवात केली असून त्यामध्येच विश्वास ठाकूर यांचाही समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक असणारे विश्वास ठाकूर कवी व लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘आमचेकरं आता परकल्प आयलंय’ ही कविता बी.ए. च्या दुसऱ्या वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होवू लागला आहे. आगरी बोलीतील साहित्य रचना विपुल प्रमाणात आहे. आजपर्यंत ती इतकीशी समाजाभिमुख झाली नव्हती. पण विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने सर्व दूरपर्यंत या साहित्याचा प्रचार होईल. आगरी बोलीतील साहित्याने मराठी भाषा व साहित्याचे वैभव आणखी वाढेल, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. विश्वास ठाकूर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आगरी समाज टीकेचा आणि आगरी बोली विनोद आणि उपहास याच अंगाने पाहिले जायचे. मात्र आता अभ्यासक्रमात याचा समावेश झाल्याने या समाजातील सुसंस्कृतपणा, वास्तवसत्य यांचे दर्शन होईल.