मुंबई : मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ, राज्यातील राज्य कामगार विमा योजना, सार्वजनिक आरोग्य मंत्रालय आणि जिल्हा परिषदेतील बंधपत्रित नर्सेसनी, सोमवारी आझाद मैदानाबाहेर पडत शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानात परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र, शासन चर्चेस तयार नसल्याने नर्सेसना आक्रमक पवित्रा घेऊन हे आंदोलन करावे लागल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड यांनी दिली.गायकवाड म्हणाले की, बंधपत्रित नर्सेसच्या मागण्यांवर आरोग्य विभागाकडून राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त, सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि जिल्हा परिषदेचे प्रधान सचिवांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. प्रत्यक्ष निर्णय घेण्यास दिरंगाई सुरू असून, गेल्या ६ महिन्यांपासून बैठकीसाठी वेळ देण्यासही चालढकल सुरू आहे. परिणामी, आरोग्यमंत्र्यांनी तिन्ही विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची महासंघाची मागणी आहे. तेव्हाच नर्सेसचे प्रश्न मार्गी लागू शकतात, नाहीतर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव मागविण्यास प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ एप्रिल २०१५ रोजी अधिसूचना जारी करत, सर्व आरोग्य बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित नर्सेसला लागू नसल्याचे सांगत, आयुक्तांनी मंत्रालयातून तसे आदेश आणण्यास सांगितले. तेव्हापासून या प्रकरणी टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी, या प्रकरणाची चौकशी करून, सर्व बंधपत्रित नर्सेसची विशेष परीक्षा घेऊन, सेवा नियमित करण्याची मागणी महासंघाने केली आहे. यामध्ये २५ आॅगस्ट २००५ सालानंतरच्या सर्व बंधपत्रित नर्सेसना, नियुक्ती दिनांकापासून कायम करण्याचे आवाहनही महासंघानेकेले आहे.
आरोग्य विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:11 AM