३०० दिंड्यांनी पोचवली प्रतिकात्मक माघ वारी; विणेकऱ्यांसह मोजक्या वारकऱ्यांची दिंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:40 AM2021-02-22T01:40:43+5:302021-02-22T01:40:43+5:30
परंपरा पाळल्या; विणेकऱ्यांसह मोजक्या वारकऱ्यांची दिंडी
बाळासाहेब बोचरे
मुंबई : वारी चुकू न दे हरी अशी कायम मनी आस असलेल्या वारकऱ्यांनी आपली परंपरा अखंडित ठेवण्यासाठी यंदाची माघवारी प्रतिकात्मक पद्धतीने आणि कमीतकमी वारकऱ्यांसह करण्याचा पर्याय निवडला असून आतापर्यंत सुमारे ३०० दिंड्यांनी केवळ विणेकरी व मोजक्या वारकऱ्यांसह माघी वारी पोचवली असल्याचे सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळीनी सांगितले.
माघ शुद्ध दशमी ! पाहोनी गुरुवार
केला अंगीकर! तुका म्हणे!!
वर्षातील चार महत्त्वाच्या वाऱ्यांपैकी माघी एक महत्त्वाची वारी असून माघ शुद्ध दशमीला जगद्गुरू तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला तो दिवस वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुरुवार आला तर तो सुवर्णयोगच. याबाबत गहिनीनाथ महाराज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आम्ही मोजक्या वारकऱ्यांसह पंढरपूरला आलो आहोत. मंदिरातील नित्योपचार मोजक्या लोकांसह सुरू आहेत. त्रयोदशीला आमचे चक्री भजनही मोजक्या वारकऱ्यांसह होणार आहे. दशमीला रात्रीपासून सुरु झालेली संचारबंदी एकादशीलाही लागू राहणार आहे.
बंडातात्यांचे आवाहन
पंढरपुरात काही वारकरी मठामध्ये मुक्कामी आहेत. मठामध्ये १५ ते २० लोकांना परवानगी आहे. जादा असलेल्या लोकांना बाहेर जाण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना रस्त्यावर आणू नका असे आवाहन ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी प्रशासनाला केले आहे.