लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनादरम्यान ताप, खोकला, चव जाणे, वास न येणे, श्वसनास त्रास अशी लक्षणे दिसून येतात. आता मात्र कोरोना रुग्णांमध्ये कर्णबधिरतेचा त्रास हेही लक्षण दिसून आले आहे. त्यामुळे राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टरांनी याकडेही लक्ष देण्याची सूचना केली आहे.याविषयी राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, ऐकण्याची समस्या, न थांबणारी डोकेदुखी, त्वचेवर व्रण, अशक्तपणा ही कोरोनाची काही नव्याने आढळलेली लक्षणे आहेत. कोरोनाला जवळपास १७ महिने उलटून गेले आहेत. तरीही नवी लक्षणे पुढे येत असल्याने याकडे अधिक सजगपणे पाहण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले. कूपर रुग्णालयाच्या कान- नाक- घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर भार्गवा यांनी सांगितले की, कर्णबधिरतेचा त्रास असलेले कोरोना रुग्णाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, याविषयी अधिक सतर्कपणे वैद्यकीय तपासणी व चाचण्या करण्यावर भर दिला आहे.
डॉ. संजय ओक यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचे म्युटेशन झाले. त्यावेळेस अनेक रुग्णांना पोटदुखी व त्याच्याशी संबंधित अनेक आजार झाल्याचे समोर आले. कोरोनाचे निदान लवकर करण्यावर भर द्यायला हवा, यात फॅमिली डॉक्टरची भूमिका महत्त्वाची आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून शोध-निदान आणि उपचार ही प्रक्रिया सुलभ होईल. कोरोना पॅझिटिव्ह आल्यानंतर शरीराचे तापमान, श्वसनाचे मोजमाप, उच्चरक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण आणि साखरेची पातळी या गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष ठेवून समतोल राखला पाहिजे. नाहीतर म्युकरमायकोसिससह अन्य गुंतागुंतीचा धोका निर्माण होतो.