मुंबई : कोरोनाची लक्षणे वर्षभर रुग्णाच्या शरीरात राहतात असे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय लॅन्सेट अहवालात नोंदविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने थकवा, फुफ्फुसाचा त्रास आणि श्वसनास होणारा त्रास ही लक्षणे दिसून येतात. या अहवालानुसार, काही रुग्णांना बरे होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागतो. त्यात अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हा काळ अतिशय आव्हानात्मक असतो असेही नमूद आहे.
या अहवालात जागतिक स्तरावरील सतराशे रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास करण्यात आला आहे, या व्यक्तींना पहिल्या दिवसापासून लक्षणे दिसू लागल्यापासून ते थेट १२ महिन्यांनंतरची आरोग्यविषयक निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. या अहवालाप्रमाणे, एक तृतीयांश म्हणजेच ३० टक्क्यांहून अधिक रुग्णांना १२ महिन्यांपर्यंत श्वसनास त्रास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याखेरीज, कोविड रुग्णांमध्ये सहा महिन्यांपर्यंत स्नायूदुखीचा त्रासही दिसून येतो. यात पाचमधील एका रुग्णांमध्ये काही काळानंतर हा त्रास कमी होत असल्याचे दिसते. यात सहभागी घेतलेल्या रुग्णांनी सहा महिन्यानंतर सीटीस्कॅन चाचणी केल्यावर त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्याचे दिसून आले, अशा रुग्णांना डॉक्टरांनी नियमित आरोग्य तपासणीचा सल्ला दिला आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांना त्रास-
या अहवालानुसार, पुरुष रुग्णांच्या तुलनेत महिला रुग्णांना अधिक त्रास झाल्याचे दिसून आले आहे. महिला रुग्णांमध्ये स्नायूदुखी, थकवा, नैराश्य ही प्रमुख लक्षणे दिसून आली. जे गंभीर आजारी होते, त्यांना अद्याप श्वसनाचा त्रास होत असल्याचे जाणवल्याचे दिसले.
संशोधकांसमोरही मोठे आव्हान-
कोरोनाची लक्षणे आणि त्यानंतर शरीरावर होणारा परिणाम याबाबत संशोधक अभ्यास करत आहेत. हा विषाणू स्वरूप बदलत असल्याने संशोधकांसमोरही मोठे आव्हान आहे. कोरोनाची लक्षणे आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत वेगवेगळ्या गोष्टी उघड होत आहेत. गंध आणि चव जाणे ही कोरोनाची लक्षणे काही कोरोनाबाधितांमध्ये दिसतात, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.