मुंबई : कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये गुइलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचे समोर येत आहे. या आजारात पायापासून शरीराला थकवा जाणवत जातो, तो हळूहळू हातापर्यंत पोहोचतो. हा दुर्मीळ आजार आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या आजारात हातपाय लुळे पडतात. औषधोपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास जीबीएसची लवकर लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, हात, पाय, फुप्फुस, श्वसननलिकेवरही हल्ला करतो. रुग्णाची अवस्था लकवा आल्यासारखी होते. बऱ्याचदा श्वास घेण्यास त्रास होतो.
आपल्याच शरीरातील पेशी लसीकरणाद्वारे आलेले अँटीजन किंवा अँटीबाडीजशी लढताना आपल्याच शरीरातील पेशींशी लढायला सुरुवात करतात. त्यामुळे रुग्णाला थकवा येतो. वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास हा आजार बरा होतो. घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. - डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
काय आहेत जीबीएसची लक्षणे?
या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांना अर्धांगवायूचा झटकादेखील येऊ शकतो. संपूर्ण शरीरात हा विषाणू पसरल्यास धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांनी तातडीने उपचार करावेत. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. पायापासून हाताचे स्नायू कमकुवत होतात. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. काही लोकांना गिळायला त्रास होतो.