Join us

हात-पाय लुळे पडण्याची लक्षणे, असू शकतो जीबीएस; कोरोनानंतर वाढली समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 11:37 AM

कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी कोरोनानंतर मात्र काही नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई :  कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी कोरोनानंतर मात्र काही नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काहींना कोरोनापेक्षा भयंकर समस्या जाणवत आहेत. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर काही जण तीन ते चार महिने विविध आजारांनी त्रस्त आहेत. काही नागरिकांना तर ‘जीबीएस’ (गुलियन बॅरी सिंड्रोम) हा आजार झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. या आजारामध्ये नागरिकांचे  हात, पाय लुळे पडत असून, याकरिता त्यांनी  तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ आजार आहे. यामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. विशेष म्हणजे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. या आजारामुळे मज्जातंतू निकामी होत जातात. त्याचा परिणाम हातांवर, पायांवर आणि बोटांवर होतो. संवेदना हरपतात. तसेच काही वेळेला रुग्णामध्ये पक्षाघातासारखी काही लक्षणे आढळून येतात. तसेच याचा परिणाम श्वसन संस्थेवर होऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे रुग्णास अनेकवेळा कृत्रिम प्राणवायू दिला जातो. या अशा रुग्णांवर तत्काळ उपचार होणे गरजेचे असते. हा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. 

कोरोनाचा आजार झाल्यानंतर काही रुग्णांना या सिंड्रोमचा त्रास झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरा  होत असला तरी काहींना अंग दुखणे, पाय दुखणे, स्मृतिभ्रंश, मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. डॉक्टर रुग्णांवर लक्षणांप्रमाणे उपचार करताना दिसत आहेत. मात्र, अनेक रुग्णांचे दुखणे हे अनेक महिने चालत असल्यामुळे रुग्णांमध्ये चिडचिड निर्माण झाली आहे. 

गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा आजार कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या प्रत्येक रुग्णामध्ये दिसत नाही. मात्र, काही रुग्णांमध्ये हा आढळून येत असल्याने मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे.    

गेल्या दोन वर्षांत २० ते २२ रुग्णांवर केले उपचार

 या प्रकरणी बॉम्बे रुग्णालयाचे न्यूरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले की, मुख्यतः हा सिंड्रोम कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. विशेष म्हणजे कोरोनाचा आजार हा विषाणू संसर्गामुळेच होत असल्याने कोरोनाच्या आणि कोरोनानंतरच्या काळात हे रुग्ण जास्त पाहावयास मिळाले आहेत. 

 गेल्या दोन वर्षांत मी २० - २२ रुग्णांना उपचार दिले आहेत. यामध्ये उपचार पद्धती ठरलेली आहे. पाच दिवसांचा इम्युनोग्लोबीन इंजेक्शनचा कोर्स दिला जातो. तसेच जर रुग्ण अधिक गंभीर असेल तर प्लाज्मा थेरपीचा वापर करण्यात येतो. 

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात मोठा अपघात, बस पुलावरून नदीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

 पावसाळ्याच्या हंगामानंतर अशा पद्धतीचे रुग्ण पाहावयास मिळतात; कारण त्या काळात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण  अधिक असते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या