कोविड १९ मुळे होणारी केसगळती व उपाय
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना बरा झाल्यानंतरही अनेकांमध्ये लक्षणे कायम असतात. केसगळती हाेते. या समस्येचा घेतलेला आढावा.
सध्या आपण सर्वजणच कोविड १९च्या महामारीच्या संकटातून जात आहोत. कोविडमधून बऱ्या झालेल्या कितीतरी लोकांना अनेक लक्षणांनी ग्रासले आहे. त्यातले एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे माेठ्या प्रमाणात हाेणारी केसगळती. सध्या सर्वच त्वचारोग तज्ज्ञांकडे या तक्रारीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
केशचक्र (Hair Cycle) : केसगळतीची कारणे समजावून घेताना आपण केसांच्या वाढीचे नैसर्गिक चक्र समजावून घेतले पाहिजे. कोणत्याही निरोगी माणसाच्या डोक्यावरील प्रत्येक केसाच्या लांबीमध्ये साधारण तीन-चार वर्षे सातत्याने वाढ होते व नंतर ते केस गळून पडतात. त्यानंतर, त्याच मुळापासून नवीन केस येतात. जुना केस गळण्यापूर्वीच नवीन केसाचा कोंब येऊ लागतो, जो पुढचे तीन वर्षे वाढत राहून, त्यानंतर चक्रक्रमाने परत गळतीच्या टप्प्यामध्ये जातो.
आपल्या डोक्यावर १ लाख केस असतात व ते वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असतात. निरोगी व्यक्तीमध्ये त्यातील साधारणपणे पन्नास ते सत्तर केस रोज नैसर्गिकरीत्या गळून पडतात, परंतु गळती व वाढ यातील संतुलनामुळे रोज केस गळल्यानंतरही आपला केशसंभार टिकून राहतो. डोक्यावरील कोणताही केस तीन-चार वर्षांपेक्षा जुना नसतो. वाढीसाठी केसांना वेगवेगळ्या पौष्टिक घटकांची मोठ्या प्रमाणात गरज असते.
- तणावानंतर होणारी केसगळती
जेव्हा तणावपूर्ण परिस्थिती येते, (कोणत्याही प्रकारचा ताप, रक्तस्त्राव, तीव्र मानसिक तणाव, वजन घटणे मोठी शस्त्रक्रिया इ.) तेव्हा मात्र पौष्टिक घटकांची केसांची गरज बऱ्याच वेळा शरीराकडून भागवली जात नाही व त्यामुळे बरेच केस त्यांचा वाढीचा कालावधी पूर्ण करू शकत नाहीत. ते मोठ्या संख्येने ‘मुदतपूर्व निवृत्ती’ स्वीकारून गळतीच्या टप्प्यामध्ये जातात. गळतीचा टप्पा साधारण तीन महिन्यांचा असल्यामुळे, अशा तणावपूर्ण परिस्थितीच्या तीन महिन्यांनंतर केसगळतीचे प्रमाण एकदम वाढल्याचे आढळून येते. प्रसूतीनंतर तीन महिन्यांनंतरही केस गळतात, पण त्याचे कारण थोडे वेगळे असते.
- कोविडनंतरच्या केस गळतीची कारणे : कोविड झाल्यावरही अशी तणावपूर्व परिस्थिती शरीरात तयार होते. ती तयार होण्याला बरीच कारणे असतात, त्यावर आता चर्चा करू.
इतर कोणत्याही तापामध्ये जे शारीरिक बदल होतात ते कोविडनंतरही होणार हे ओघाने आलेच. कोविड संसर्गादरम्यान शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये दाह (इन्फ्लमेशन) निर्माण होतो. त्यामुळे शरीराच्या सर्वच यंत्रणेवर व अवयव प्रणालींवर कमालीचा ताण पडतो.
लॉकडाऊनमुळे काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा त्या संकटात आहेत. कुटुंबीय व प्रियजनांना प्रवास करून भेटता येत नाही. या सर्वांचा प्रचंड मानसिक तणाव येणे नैसर्गिक आहे. त्यातून प्रत्यक्षात स्वतःला अथवा कुटुंबातील व्यक्तीला कोविड झाला, तर तणाव अधिकच वाढताे. या सर्वांचा केसांवर अनुचित परिणाम होतो. कोविडच्या आजारपणात वेगवेगळी औषधे दिली जातात. त्यातील बऱ्याच औषधांच्या ज्ञात दुष्परिणामांच्या यादीत केसगळतीचा उल्लेख आहे.
- कोविडमुळे होणाऱ्या केसगळतीची लक्षणे
साधारणपणे कोविड होऊन गेल्यानंतर २-३ महिन्यांनी हा त्रास सुरू होतो. ही केसगळती इतर कोणत्याही तापामुळे होणाऱ्या केसगळतीपेक्षा खूपच जास्त तीव्रतेची असते. रुग्णाच्या घरात सर्वत्र केसच केस होतात. केसात हात घातला की, बटच्या बट निघून येते. पूर्ण टक्कल पडण्याची अकारण भीती रुग्णाला वाटू लागते.
- कोविडच्या केसगळतीवरील उपाय
समाधानकारक गोष्ट म्हणजे इतर कोणत्याही तापामुळे होणाऱ्या केसगळतीप्रमाणे कोविडमुळे होणारी केसगळती ही फारसे कष्ट न घेता, २-३ महिन्यांमध्ये आपोआप कमी होत जाते, परंतु तोपर्यंत रुग्णाचे बरेच केस गळून जातात. त्यामुळे केशसंभार पूर्वीप्रमाणे होण्यासाठी बराच काळ जावा लागतो.
अशा रुग्णांच्या उपचारासाठी लोह, ब जीवनसत्त्व (विशेषकरून बायोटिन), तसेच ड जीवनसत्व असणाऱ्या गोळ्या दिल्या जातात. मिनॉक्सिडील हे केसवाढीसाठी वरून लावण्याचे लोशन स्वरूपाचे औषध उपलब्ध आहे, परंतु बऱ्याच वेळा मिनॉक्सिडील वापरू लागल्यानंतर तात्पुरती केसगळती वाढल्याचे निदर्शनाला येते. खरे तर ही गळती गळू घातलेल्या म्हणजेच त्यापूर्वीच मुळांपासून विलग झालेल्या केसांचीच असते, त्यामुळे फार काही बिघडत नसते, परंतु अशी गळती दिसू लागल्यावर रुग्ण अकारण घाबरून जातो, म्हणून बऱ्याच वेळा अशा रुग्णांमध्ये मिनॉक्सिडीलचा वापर करणे, किमान केसगळतीच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत तरी टाळले जाते. केसगळती लांबल्यास मात्र त्याचा वापर अपरिहार्य ठरतो. कॅपेक्सिल, प्रोकॅपिल इ. सौम्य औषधेही केसगळतीच्या उपचारांसाठी उपलब्ध आहेत.
केस हे प्रथिनांपासून बनतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आहारामध्ये प्रथिनांचा अंतर्भाव वाढविला पाहिजे. शाकाहारी जेवणात कडधान्ये, सोयाबीन, बदाम, दुग्धजन्य पदार्थ तर मांसाहारी जेवणात अंड्याचा पांढरा बलक, मासे, चिकन, मटण अशा गोष्टींमध्ये प्रथिने भरपूर असतात.
मानसिक संतुलन राखणे, केसगळतीमुळे पूर्ण टक्कल पडण्याची भीती डोक्यातून काढून टाकणे फार गरजेचे आहे. केसगळती तीव्र असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. कोविडच्या उपचारासाठी व नंतर दिलेली कोणतीही औषधे केसगळती वाढण्याच्या भीतीने बंद करू नका.