खुशालचंद बाहेती ।
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे विशेष साहाय्य देण्यात अडचणी निर्माण करणाऱ्या अटी रद्द करून सुटसुटीत प्रक्रिया आणणारे नवीन परिपत्रक पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केले आहे. ‘लोकमत’च्या २७ सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरच्या अंकात याबद्दल पाठपुरावा करण्यात आला होता.
दिनांक १८ व २८ सप्टेंबरच्या दोन परिपत्रकांत बदल करणारे परिपत्रक दि. १ आॅक्टोबर रोजी संजीव कुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) यांनी जारी केले आहे. यात यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र आयसीएमआर मान्यताप्राप्त हॉस्पिटलचे असावे, ही अट पूर्णपणे रद्द केली आहे. आता फक्त कोविड-१९ झाल्याचे प्रमाणपत्र आणि मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र यासाठी द्यावे लागणार आहे. प्रस्ताव ई-मेलने पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मृत्यूपूर्वी किंवा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कर्तव्यावर होता, याबद्दलचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
कर्मचारी कोरोना-१९ प्रतिबंध कर्तव्यावर होता, हे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे, असेही परिपत्रकात नमूद आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वत: प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता राहिलेली नाही. कोरोना सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार मदतकार्य इत्यादी. कर्तव्य करणारे सर्व विभागांचे पोलीस यासाठी पात्र असतील. विशेष साहाय्य तात्काळ मिळावे म्हणून महासंचालक कार्यालयात २ अधिकाºयांची विशेष नेमणूकही करण्यात आली आहे.पोलिसांना विशेष साहाय्य देण्याची पद्धत अतिशय सुटसुटीत करण्यात आली आहे. ५० लाख रुपयांचे विशेष साहाय्य लवकरात लवकर कुटुंबियांना मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.-संजीवकुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालकनवीन परिपत्रकामुळे सर्व पोलिसांना दिलासा मिळेल. ‘लोकमत’चा पाठपुरावा यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.-एम.एन. सिंह, पोलीस महासंचालक (निवृत्त)