दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात यंत्रणा सज्ज
By संतोष आंधळे | Published: September 7, 2023 04:13 PM2023-09-07T16:13:43+5:302023-09-07T16:14:27+5:30
केइएम रुग्णालयात दोन गोविंदावर अजून उपचार सुरू
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संपूर्ण शहरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काही गोविंदा जखमी झाल्याने त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत सुदैवाने कोणत्याही गोविंदाला गंभीर दुखापत झालेली नाही. बहुतांश गोविंदांना मुक्का मार लागला असून त्यांना प्रथमोपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर के इ एम रुग्णालयात दोन गोविंदावर अजून उपचार चालू असून त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका गोविंदाला मार लागल्यानंतर त्याचसोबत येणाऱ्या आणखी काही गोविंदा सोबत येत असल्यामुळे महापालिकेची कॅज्युल्टी गोविंदामय झाल्याचे चित्र सर्वच रुग्णालयात दिसत आहे.
के इ एम रुग्णलायत दुपारी दोन वाजेपर्यंत १० पेक्षा अधिक गोविंदावर उपचार करण्यात आले होते. जखमी झालेले गोविंदा हे मुंबईच्या विविध पथकातील आहे. सर्वात अधिक जखमी गोविंदा के इ एम रुग्णलयात पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे रुग्णालयात गोविंदाची गर्दी होऊ नये. जखमी गोविंदांना व्यवस्थित उपचार मिळावेत. डॉक्टरांना उपस्थित तपासता यावे म्हणून स्थानिक कै. रवींद्र (भाई ) भोसले मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यांनी के ई एम रुग्णलयाच्या परिसरात छोटेखानी मंडप टाकला आहे. या मंडळाचे कार्यकर्ते जखमी गोविंदांना तात्काळ कॅज्युल्टी दाखल व्हावे म्हणून मदत करत आहे.
या मंडळाचे संचालक सचिन धुरी यांनी सांगतिले कि, सध्या दुपारी पर्यंत तरी कोणत्याही गोविंदाला गंभीर दुखापत झालेली नाही. आतपर्यंत १० पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाले असून काहीना उपचार करून सोडले तर काही वर उपचार सुरु आहे. सर्व जखमी गोविंदाची नोंद करून ठेवण्यात येत आहे. "
मुंबई महापालिकेने दुपारी १२ पर्यंत दिलेल्या माहितीनुसार, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सर्व रुग्णलयातील १२५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे.