काेराेनाच्या रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज - सुरेश काकाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 05:22 AM2021-02-14T05:22:50+5:302021-02-14T05:27:19+5:30
CoronaVirus news in Mumbai : अनलाॅकच्या पुढच्या टप्प्यात रुग्णवाढीचा धोका ओळखून मुंबई महापालिका कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.
मुंबई : शहर, उपनगरात लाेकल सेवा सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे का, याचा अभ्यास पालिका प्रशासन करत आहे. मात्र, लोकलसेवा सुरू होऊन मोठा कालावधी उलटलेला नसल्याने आणखी काही काळाने लोकल सेवांच्या वेळेत बदल करण्यासंबंधी संबंधित यंत्रणांशी संवाद साधून निर्णय घेण्यात येईल. अनलाॅकच्या पुढच्या टप्प्यात रुग्णवाढीचा धोका ओळखून मुंबई महापालिका कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.
मुंबईत कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे का?
सध्या शहर उपनगरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. शहर, उपनगरात एकूणच कोविडवाढीचा दर आणि दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
लोकल सेवा सुरू झाल्यानंतरची प्रशासनाचे काय निरीक्षण आहे?
मुंबईत लोकल सेवा सुरू झाल्यानंतरही गेल्या आठवडाभरात कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोना आटोक्यात येत आहे. म्हणून गाफील राहून चालणार नाही. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक असल्याचे काकाणी यांनी सूचित केले. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. ती पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचे कारण नाही.
तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी काय तयारी आहे?
मार्चमध्ये लसीकरणाची सुविधा पन्नास वर्षांवरील तसेच इतर शारीरिक व्याधी असलेल्या गटांसाठी सुरू होईल, अशी शक्यता पालिका प्रशासनाने वर्तवली आहे. या लसीकरणासाठी केंद्र सरकारची कोणती नियमावली अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, नियोजनाच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल. काेरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व लसीकरण केंद्रांवर सुरक्षित अंतराचा निकष पाळणे महत्त्वाचे आहे. जम्बाे सुविधा तसेच इतर रुग्णालयांमधील मोठ्या जागा असल्यामुळे सुरक्षित अंतराचा निकष काटेकोरपणे पाळला जाईल.
रुग्णालयांत अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येईल?
भंडारा दुर्घटनेनंतर शहर, उपनगरातील सर्व रुग्णालयांची अग्निप्रतिबंधक यंत्रणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १,१४९ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यात ३०० रुग्णालयांमध्ये योग्य स्थिती आढळून आली. मात्र ६३९ रुग्णालयांमध्ये किरकोळ त्रुटी, तर ४० रुग्णालयांमध्ये गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचे आढळून आले. या किरकोळ त्रुटींमध्ये असलेल्या रुग्णालयांना नोटीस पाठवून विहित कालावधीत त्रुटी सुधारण्यास सांगितले जाते. तपासणीत १२८ रुग्णालय किंवा आरोग्य संस्थांमध्ये अग्निसुरक्षा सेवा बंद असल्याचे आढळून आले. या संस्थांवर त्वरित कारवाई करून ही सेवा सुरू कऱण्यास सांगितले जाते. शिवाय, विहित काळात त्रुटी दूर न करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्यात येते.
खासगी रुग्णालयात लसीकरण प्रक्रिया कशी राबविण्यात येईल?
तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येईल. त्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढेल. त्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागणार असल्याने खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार येत्या सोमवारपासून खासगी रुग्णालयांना सुरुवातीला फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण प्रक्रियेवर पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष असेल.
(मुलाखत : स्नेहा मोरे)