पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:22+5:302021-07-19T04:06:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका ...

Systems in Mumbai should be more careful considering the warning of rain | पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी

पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील सूचना केल्या.

विशेषत: दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे. पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आता काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे. हे पाहता रात्रीदेखील पाणी उपसा करणारी यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे. पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटन घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा, अशा सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या.

सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे. अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे रोग पसरू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देतानाच पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर असल्याचे महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

‘पुढील तीन दिवस महत्त्वाचे’

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरू करण्याची सूचना केली. मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत, मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का याची चाचपणी करावी, असेही ते म्हणाले. पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी, असे सांगितले.

Web Title: Systems in Mumbai should be more careful considering the warning of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.