तांत्रिक अडचणी मुंबई विद्यापीठाची पाठ सोडेनात; निकालाची डेडलाइन चुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:00 AM2017-07-29T05:00:46+5:302017-07-29T05:00:50+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या दिरंगाईमुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून, ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. डेडलाइन संपायला फक्त तीन दिवस उरले असताना, अजूनही ३ लाख ७० हजार २९० उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या दिरंगाईमुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून, ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. डेडलाइन संपायला फक्त तीन दिवस उरले असताना, अजूनही ३ लाख ७० हजार २९० उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. त्यामुळे निकालाची डेडलाइन चुकणार असल्याचेच दिसत आहे. मुंबई विद्यापीठाचा निकाल वेळेत लागावा, म्हणून महाविद्यालयांच्या सुट्टीत ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली असली, तरी तांत्रिक अडचणींचा अडथळा कायमच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर करायला उशीर केल्याने, अखेर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हस्तक्षेप केला होता. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करा, अशी ताकीदच राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिली होती. त्यानंतर, विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या कामाने वेग घेतला
होता, पण आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे प्राध्यापकांना अनेक अडचणी येत होत्या. आजही प्राध्यापकांना तांत्रिक अडचणी येत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ४१ हजार ९६५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली, तर ३६ हजार ५४१ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले. एकूण ३ हजार ६२० प्राध्यापकांनी मिळून शुक्रवारी एका दिवसात ७८ हजार ५०६ उत्तरपत्रिकांची तपासणीचे काम पूर्ण केले असल्याची माहिती, विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी दिली. त्यामुळे आता शेवटचे तीनच दिवस शिल्लक असल्याने, उत्तरपत्रिका तपासणीचे आव्हान विद्यापीठासमोर आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांचे अधिकाधिक निकाल शुक्रवार आणि शनिवारमध्ये जाहीर करण्यासाठी विद्यापीठ तयारी करत आहे. निकाल लावणे हेदेखील विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे.
कारण उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग एका कंपनीने केले आहे, बारकोड आणि विद्यार्थ्यांच्या क्रमांकाचे स्कॅनिंगचे काम हे दोन भिन्न कंपन्यांकडे आहे. त्यामुळे या सर्वांचा मेळ घालून निकाल लावायचे आहेत. या प्रक्रियेतही काही तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महत्त्वाचे निर्णय लावण्यात विद्यापीठाला यश आले, तरी सर्वच निकाल लावणे शक्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे.
३१ जुलैची डेडलाइन पाळण्यासाठी प्राध्यापकांना रविवारीही काम
करावे लागणार आहे. गेला आठवडाभर प्राध्यापक कॅप सेंटरमध्ये
बसूनच काम करत आहेत. रविवारीही काम करावे लागणार असल्यामुळे प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही कला आणि वाणिज्य शाखांच्या निकालांचे काम करण्यास सुरुवात झालेली नाही.