मुंबई : ज्येष्ठ तबलावादक, संशोधक, लेखक, संगीततज्ज्ञ पंडित सुधीर माईणकर यांचे शुक्रवारी वयाच्या ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने कांदिवली येथील राहत्या घरी निधन झाले. पंडीत सुधीर माईणकर यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंडित सुधीर माईणकर यांनी मागील अनेक वर्षे तबला वादन विषयातील अभ्यास, संशोधन, त्या अनुषंगाने केलेले लेखन, रचनाकार, समीक्षक अशा बहुआयामी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याबद्दल यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुधीर यांनी कायदा, पेशकार, लय-लयकारी व्याख्या अधिक सुस्पष्टपणे तयार केल्या. त्यांनी तालाचे दशप्राण, लिपी, घराणी व इतिहास अशा जुन्या विषयांकडे आधुनिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पूरक आणि विरोधी नादसंगती, भाषेतील वृत्तांवर आधारित बंदिशी, गेस्टॉल्टचा बोधनक्रियेतील विचार आणि तबलावादन असे पूर्णपणे नवीन विषय मांडले.आपले हे विचार आणि संशोधन भावी पिढीला उपयुक्त ठरावे यासाठी सुधीर माईणकरांनी ‘तबला वादन : कला और शास्त्र’ आणि ‘ तबला वादन में निहित सौंदर्य’ या हिंदी, तर 'अॅस्थेटिक्स ऑफ तबला' हे इंग्रजी अशा तीन ग्रंथांची निर्मिती केली. ‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे.