Join us

तबला वादनाने जिंकली रसिकांची मने; उस्ताद झाकीर हुसेन यांचा माहीम ते अमेरिका प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 10:37 IST

यासोबतच इतर देशांमध्येही त्यांच्या तबला वादनावार रसिक फिदा आहेत. 

९ मार्च १९५१ रोजी सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखाँ आणि बावी बेगम यांच्या घरी झाकीर हुसेन यांचा जन्म झाला. वडील तबलावादक असल्याने घरातच त्यांना तबला वादनाचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या हुसेन यांनी सातव्या वर्षीच आपल्या जीवनातील पहिली मैफल रंगवली. वयाच्या अकराव्या वर्षी अमेरिकेमध्ये आपली पहिली कॅान्सर्ट करत त्यांनी संपूर्ण जगातील संगीत प्रेमींचे लक्ष वेधले. अमेरिकेमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. यासोबतच इतर देशांमध्येही त्यांच्या तबला वादनावार रसिक फिदा आहेत. 

१९७० मध्ये सतारवादक पं. रवीशंकर यांना तबल्यावर साथ करण्यासाठी ते अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथेही त्यांनी आपला प्रभाव दाखवला. तबला वादनाच्या अद्भूत कौशल्यामुळे बालवयापासूनच त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध वादकांना साथसंगत करण्याची संधी मिळाली. पं. रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. व्ही. जे. जोग, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज आदी शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या अनेक गायक-वादकांना त्यांनी तबल्यावर साथ केली.२०१७ मध्ये हुसेन यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील संगीत नाटक अकादमीचा ‘अकादमी रत्न’ पुरस्कारही त्यांना मिळाला.

हुसेन यांची ‘वाह ताज’ ही जाहिरात रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरली. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीट अँड डस्ट’ या चित्रपटाद्वारे ते रुपेरी पडद्यावर झळकले होते. यात ते शशी कपूर यांच्यासोबत दिसले होते. याखेरीज १९९८ मध्ये आलेल्या ‘साज’ या बहुचर्चित चित्रपटात त्यांनी शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. इव्हनिंग राग, शांती, रोलिंग थंडर, शक्ती आदी त्यांचे अल्बमही संगीतप्रेमींच्या भेटीला आले होते. २०१६ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी हुसेन यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. 

 

टॅग्स :झाकिर हुसैन