दप्तराच्या ओझ्याची कैफियत आता टिकटॉकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:38 AM2019-07-21T03:38:52+5:302019-07-21T03:39:08+5:30
नवा शैक्षणिक हॅश टॅग चर्चेत; गुड, बॅड टचपासून भाषांतर । आकडेमोडीचे व्हिडीओही व्हायरल
सीमा महांगडे
मुंबई : ‘दादा, तू कुठे चाललास? मी कॉलेजला चाललोय... मग तुझा अभ्यास माझ्या अभ्यासापेक्षा जास्त असेल ना? तरीही माझे दप्तर तुझ्या दप्तरापेक्षा जड कसे?’ असा प्रश्न विचारून निरुत्तर करणारा व्हिडीओ सध्या टिकटॉकवर व्हायरल होत आहे. सोबतच आई ही मुलीला हावभाव आणि स्पर्शाच्या माध्यमातून देत असलेले गुड टच आणि बॅड टचचे धडे असलेला व्हिडीओही टिकटॉकवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओजला लाखोंमध्ये लाइक्स मिळत असून, जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांकडून ते पाहिले जात असून, त्यावर कमेंट्स मिळत आहेत.
काही महिन्यांपूर्वी टिकटॉक या अॅपवर बंदी आल्यानंतर ती उठविण्यात आली. त्यानंतर, टिकटॉकने त्याची भारतातील मोठी बाजारपेठ म्हणजेच तरुणाईवर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच टिकटॉकने नवा ट्रेंडिंग हॅशटॅग सुरू केला. त्या अंतर्गत तरुणांना उपयोगी असलेले इंग्रजी भाषांतर कसे करावे? गणितामधील आकडेमोडीच्या सोप्या युक्त्या, पालकांसाठी मार्गदशक सूचना, स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, असे विविध छोटे व्हिडीओज व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हे व्हिडीओज लाखोंच्या संख्येने पहिले जात असून, तरुणांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
दप्तराच्या ओझ्यासाठी सतत कार्यरत असणाºया सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनीही यासंदर्भातील काही व्हिडीओज शेअर केले आहेत. दप्तराच्या ओझ्याबाबत जनजागृती करणारे असे व्हिडीओज लाखो लोकांपर्यंत पोहोचले, तर नक्कीच सकारात्मक बदल घडून या विषयावर परिणामकारक उपाययोजना आखता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हे व्हिडीओज पाहून खारदांड्यातील त्यांच्या काही विद्यार्थिनींनी दप्तराच्या ओझ्यासंदर्भातील असे व्हिडीओ तयार करण्याची तयारी दर्शविल्याचेही पाटील यांनी सांगितले.