मुंबई : घाटकोपरच्या अमृतनगरमध्ये राहाणाऱ्या रोहित पाटील (२८) या तरुण चहाविक्रेत्याने गुरुवारी सकाळी फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रोहितच्या या अवस्थेला भाजप आमदार राम कदम व त्यांचे खासगी सुरक्षारक्षक जबाबदार असल्याचा आरोप पाटील कुटुंबाने केला आहे. रात्री उशीरापर्यंत रोहित बेशुद्धावस्थेत होता. तो शुद्धीवर आल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.दुपारच्या सुमारास राजावाडी रूग्णालयात रोहितचा जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या पार्कसाईट पोलिसांसमोर मीना पाटील (रोहितची पत्नी) यांनी आमदार राम कदम, त्यांचा सुरक्षारक्षक महेंद्र जाधव व अन्य दोन अनोळखी तरूणांवर आरोप केला. मीना यांच्या आरोपांनुसार अमृतनगर परिसरात रोहितची चहाची टपरी व पानाची गादी आहे. या दोन टपऱ्यांसह रोहितच्या राहत्या घराजवळील साईमंदिरावर जाधवचा डोळा होता. टपऱ्या व मंदिर हडपण्यासाठी जाधव त्याच्या साथीदारांसह गेल्या काही दिवसांपासून रोहितला धमकावत होता. त्यामुळे रोहित निराश होता.काही दिवसांपूर्वी जाधवने दमदाटी करत रोहितला बाहेर काढून टपऱ्यांना टाळे ठोकले. मात्र दुसऱ्या दिवशी रोहितने हे टाळे तोडून दुकान पुन्हा सुरू केले. यानंतर आमदार कदम यांनी रोहितला भेटण्यासाठी निवासस्थानी बोलावले होते. ही भेट ५ जुलैला होणार होती. मात्र त्याआधीच काल रात्री जाधवने त्याच्या दोन साथीदारांसह रोहितला बेदम मारहाण केली. यानंतर रोहित खचला आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असा दावा मीना यांनी पोलिसांसमोर केला. दरम्यान, पोलीस रोहितचा जबाब नोंदवविण्यासाठी रूग्णालयात गेले होते. मात्र रोहित बेशुद्धावस्थेत होता. त्याचा जबाब नोंदविल्याशिवाय पुढील कारवाई करता येणार नाही. त्याची नेमकी तक्रार जाणून घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.भांडणाची क्लिप व्हायरलकदम म्हणतात, ‘ या प्रकरणात माझे नाव घेतले, तर त्याचे (रोहितचे) अनधिकृत धंदे तो कसे करतो ते मी बघतो? जाधव माझ्याकडे काम करत नाही. आपसातला वाद तुम्ही मिटवा मात्र माझे नाव येता कामा नये.’यानंतर मीना म्हणतात, ‘तुम्ही पाठवल्याशिवाय जाधव आमच्या दुकानांवर येईलच कसा. आमच्या शेठने सांगितले आहे टाळे ठोकायला, असे जाधवने आम्हाला सांगितले. महेंद्र जाधवचे काय करायचे ते आम्ही ठरवू. तुम्ही मधे पडू नका. त्यावर कदम म्हणतात, ‘जर माझे नाव या प्रकरणात आले तर मला मदत करावी लागेल. रोहितने त्या म्हाताऱ्याला का मारले. तो म्हाताराही आज अॅडमिट होतोय. करा एकमेकांविरोधात तक्रार.’‘त्या म्हाताऱ्याला रोहितने मारलेले नाही. याला मी व माझे सासरे साक्षीदार आहोत’, असे उत्तर मीना यांनी आमदार कदम यांना दिले.ही आॅडीयो क्लीप संध्याकाळी व्हायरल झाली आणि माध्यमांसह पोलिसांपर्यंतही पोहोचली. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही - राम कदम माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मुळात ही मारामारी अवैध फेरीवाल्यांमधली आहे. जी आॅडीयो क्लीप व्हायरल झाली, ती एडीट करून फिरवण्यात आली आहे. शिवाय रोहित पाटील या तरूणाने एका वयोवृद्धाला मारहाण केली आहे. हा वृद्ध सध्या आयसीयूत दाखल आहे.
चहाविक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: July 03, 2015 3:40 AM