आत्मसंरक्षणासाठी विद्यार्थिनींना स्पर्शाचे धडे
By admin | Published: March 29, 2015 12:14 AM2015-03-29T00:14:54+5:302015-03-29T00:14:54+5:30
विद्यार्थिंनींना कराटेचे प्रशिक्षण देण्यास पालिकेने गतवर्षीपासून सुरुवात केली़ मात्र हे प्रशिक्षण पुरेसे नसून आत्मसंरक्षणाची गरज नेमकी कधी? याची जाणही विद्यार्थिंनींना कोवळ्या वयातच असावी,
मुंबई : विद्यार्थिंनींना कराटेचे प्रशिक्षण देण्यास पालिकेने गतवर्षीपासून सुरुवात केली़ मात्र हे प्रशिक्षण पुरेसे नसून आत्मसंरक्षणाची गरज नेमकी कधी? याची जाणही विद्यार्थिंनींना कोवळ्या वयातच असावी, असे गेल्या काही विनयभंगाच्या घटनांवर प्रकर्षाने जाणवू लागले आहे़ त्यानुसार नळ बाजार येथील पालिका शाळेतील केअरटेकरनेच विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मुलींना स्पर्श ज्ञानाचे धडे देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे़
गेल्या दोन वर्षांत ६ ते १२ वयोगटातील विद्यार्थिंनींच्या विनयभंगाची प्रकरणं वाढली आहेत़ अशा घटनांमुळे पालक हवालदिल झाले असून विद्यार्थिंनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे खाजगी शाळांनी आपल्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली़ पेशावर येथील शाळेत अतिरेकी हल्लयातून धडा घेऊन पालिकेनेही आपल्या शाळांच्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला़ शाळेतील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे़
परंतु गेल्या काही घटनांवरुन शाळेबाहेरच्याच नव्हे तर शाळेच्या आवारातही फिरणाऱ्या वासनांध नराधमांमुळे विद्यार्थिंनींचे भवितव्य धोक्यात असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, स्पर्श ओळखून त्यानुसार प्रत्युत्तर याचे धडे पालिका शाळेतील विद्यार्थिंनींना देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे़
नवीन शैक्षणिक वर्षात शुभारंभ
सुरक्षा खात्यासाठी राखीव निधीतच सीसीटीव्हीसाठी तरतूद करण्यात आली आहे़ जूनपासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत़
या घटनांमुळे वाजली धोक्याची घंटा
मार्च २०१५ : नळबाजारातील पालिका शाळेत केअरटेकरनेच शाळेच्या आवारात विद्यार्थिनीचा विनयभंग केला़
२९ सप्टेंबर २०१४: जुहू येथील शाळेच्या प्रसाधनगृहात चार वर्षीय विद्यार्थीनीचा २५ वर्षीय सफाई कामगाराने विनयभंग केला़
२८ आॅगस्ट २०१४ : पालघर येथील शाळेतील मुलांना
खाजगी व्हॅनने ने-आण करणारा वाहनचालक व त्याच्या मदतनीसाने सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचा विनयभंग केला़