ताडवाडीतील भाडेकरू स्थलांतरित होणार
By admin | Published: December 12, 2015 02:06 AM2015-12-12T02:06:38+5:302015-12-12T02:06:38+5:30
ताडवाडी येथील महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या व अत्यंत मोडकळीस आलेल्या बी.आय.टी. चाळ इमारत क्रमांक १३ ते १६ या इमारतीतील भाडेकरूंनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे
मुंबई : ताडवाडी येथील महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या व अत्यंत मोडकळीस आलेल्या बी.आय.टी. चाळ इमारत क्रमांक १३ ते १६ या इमारतीतील भाडेकरूंनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिले. महापालिकेने संबंधितांसाठी उपलब्ध करून दिलेल्या माहूल परिसरातील पर्यायी सदनिका राहण्यायोग्य असल्याचा अहवाल न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने यापूर्वीच न्यायालयाकडे सादर केला होता.
ताडवाडी परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या बी.आय.टी. चाळीच्या पुनर्विकासाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असून, अत्यंत मोडकळीस आलेल्या इमारत क्रमांक १३ ते १६ या इमारतीतील भाडेकरूंना महापालिकेने चेंबूरमधील माहूल येथे पर्यायी जागा दिल्या होत्या. परंतु माहूल येथे सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने त्या सदनिका राहण्यायोग्य नसल्याचा मुद्दा माझगाव ताडवाडी बी.आय.टी. चाळ निवासी वसाहत कृती समितीने न्यायालयासमोर उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती.
समितीने माहूल येथील पर्यायी जागेची पाहणी करून अहवाल न्यायालयाकडे सादर केला. ज्यामध्ये माहूल येथील सदनिका राहण्यायोग्य असल्याची बाब नमूद करण्यात आली. तसेच येथे उपलब्ध असलेला बाजार, शाळा, बसथांबे, रेल्वे स्टेशन, मोनो रेल स्टेशन इत्यादी सुविधांचाही उल्लेख समितीने अहवालात केला. न्यायालयाने अहवाल ग्राह्य धरून इमारत क्रमांक १३ व १४ मधील तिसऱ्या मजल्यावरील भाडेकरूंनी २ आठवड्यांच्या आत व इमारत क्रमांक १४ मधील इतर भाडेकरू, इमारत क्रमांक १५, १६ मधील सर्व भाडेकरूंनी १० जानेवारी २०१६ पर्यंत स्थंलातरित व्हावे, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)