ताडदेव अल्पवयीन मुलगा अत्याचार प्रकरण: लैंगिक अत्याचारग्रस्त मुलालाच पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 01:04 PM2023-12-02T13:04:58+5:302023-12-02T13:05:14+5:30
Taddeo minor boy rape case:
मुंबई : अपस्माराच्या (फिट) उपचारासाठी उत्तर प्रदेश येथून चुलत मामाकडे राहण्यास आलेल्या १६ वर्षीय मुलावर मामीनेच लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी ४० वर्षीय मामीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मामीच्याच तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी महिनाभरापूर्वी अल्पवयीन मुलाला अटक केली. मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर येताच त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलाला फिटचा त्रास असल्याने मामाने त्याला उपचारासाठी मुंबईत बोलावून घेतले. मात्र मामीकडून अत्याचार सुरू झाल्याने एप्रिल महिन्यात तो पुन्हा गावी परतला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मामीनेच गावच्या जमिनीच्या वादातून ताडदेव पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरोधात मुलासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दिली. तसेच त्याचे वय २० वर्षे असल्याचे पोलिसाना सांगितले. त्यानुसार, ताडदेव पोलिसांनी थेट उत्तर प्रदेश गाठून मुलाला अटक केली.
मुलाच्या आईने केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी कुठलीही खातरजमा न करता अटकेची कारवाई केली. मुलगा अल्पवयीन असल्याचे पुरावे दाखवूनही अटक केली. अखेर, तपासात अल्पवयीन असल्याचे समजताच त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली. हे चुकीचे आहे. ज्याच्यावर अत्याचार झाले, त्यालाच शिक्षा होते. माझा मुलगा निर्दोष आहे.
पोलिसांकडून नो रिस्पॉन्स
या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक शेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मामीविरोधात गुन्हा
अखेर आईने पोलिसांत धाव घेत मामीविरोधात तक्रार दिली. तक्रारीनुसार, ४० वर्षीय मामीची वाईट नजर त्याच्यावर पडली. मुलाला मारहाण करत मार्चपासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलाला घरी जेवण न देण्याबरोबर मारहाण करत गावी पाठविण्याची धमकी देत हे अत्याचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. ताडदेव पोलिसांनी बुधवारी ४० वर्षीय मामीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.