मुंबई : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अग्निकांडात संशयाचा धूर येताना दिसत आहे. रात्री कार्यालयातील सर्व विद्युत उपकरणे बंद केल्यानंतर पहाटे शॉर्टसर्किट कसे होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत ताडदेव आरटीओला आग लागली की लावली? यासाठी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.सुमारे महिन्याभरापूर्वी विलिंग्डन स्पोटर््स क्लबच्या जागेवर ताडदेव आरटीओचे विस्तारीकरण आणि वाहन तपासणी मार्ग उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातच या स्पोर्ट्स क्लबचा भूखंड आरटीओसाठी आरक्षित करण्यात आला आहे. विलिंग्डन स्पोटर््स क्लबची जागा आरटीओसाठी आरक्षित करण्याची शिफारस मुंबई महापालिकेने केली नाही. शिवाय महापालिकेच्या नियोजन समितीनेदेखील याची शिफारस केली नव्हती. त्यातच आरटीओ कार्यालयातील संपूर्ण विद्युत यंत्रणा रात्री बंद असताना पहाटे आग लागणे संशयास्पद असून, या आगीची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.रविवारच्या आगीनंतर सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरटीओचा शिकाऊ परवाना विभाग सुरू करण्यात आला. नागरिकांच्या सोईसाठी सुमारे १५ संगणकांसह एच ब्लॉकमधील सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात शिकाऊ परवाना विभाग कार्यरत करण्यात आला. सोमवारी २८० नागरिकांना शिकाऊ परवान्याच्या मुलाखतींसाठी वेळ देण्यात आली. यापैकी २३२ नागरिकांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेट दिली. ४८ नागरिक शिकाऊ परवान्यासाठी गैरहजर होते.
ताडदेव आरटीओला आग लागली की लावली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:10 AM