Join us  

नागरिकांना सुजाण करणारे ताडदेवचे जनता केंद्र; वाचकांसाठी हक्काचं ठिकाण

By संतोष आंधळे | Published: December 05, 2022 7:29 AM

अशा संस्था असे काम - ताडदेव जैन समाज आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान शिबिर होते. नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त जमा केले जाते.

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

प्रत्येक संस्थेला स्वतःची अशी एक ओळख असते. त्याचप्रमाणे ताडदेव आणि आजूबाजूच्या परिसरातील वाचकांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे जनता केंद्र आणि तेथील वाचनालय. गेली ६७ वर्षे ही वास्तू दिमाखात उभी असून, अनेकांची वाचनाची भूक भागविण्याचे काम या वास्तूत नित्यनियमाने होत असते. 

१९५४ साली या संस्थेची उभारणी झाली ती अशोक मेहता आणि वासंतीबेन श्रॉफ यांच्या  संकल्पनेतून. या परिसरातून सुजाण नागरिक घडावेत, हा त्यामागचा हेतू होता.  ताडदेवमधील तरुणांनी उभारलेल्या साध्या पत्र्याच्या शेडमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या हस्ते ‘जनता केंद्राची’ मुहूर्तमेढ रोवली गेली. जनता केंद्राचे संस्थापक दिवंगत नारायण तावडे, शांताराम तावडे, भवानजी शाह, दशरथ साळवी, राजाराम सावंत, शंकर बने, विश्वनाथ तावडे या सारख्या लोकांनी या संस्थेत मोठे काम केले. कालांतराने केंद्राचा पसारा वाढत गेला आणि जनता केंद्र नावारूपाला आले. येथे मुक्त वाचनालयात २६ हजारांपेक्षा जास्त पुस्तके असून त्यामध्ये कुमार, कथा कादंबऱ्या, नाटक आदी  विभाग आहेत.

दरवर्षी दिवाळीमध्ये ‘ग्रंथ आणि दिवाळी अंक’ प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येथे विनामूल्य अभ्यासिका आहे. १४ वर्तमानपत्रे व ३३ नियतकालिके वाचकांना मोफत उपलब्ध करून दिली जातात. मुंबई ग्रंथालय चळवळीच्या सर्व नियमांचे पालन केल्याने संस्थेच्या ग्रंथालयाला अनुदान मिळत आहे. ताडदेव जैन समाज आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान शिबिर होते. नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त जमा केले जाते. नेत्र चिकित्सा तपासणी आणि मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजनही केले जाते. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी माफक शुल्कात मराठी व इंग्रजी माध्यमांतून बालवाडी चालवली जाते. तसेच त्यांना विनामूल्य पोषण आहार दिला जातो. जनता केंद्रातील कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी कंझ्युमर्स को ऑप-सोसायटी काढून रास्त दरात कडधान्य, गहू-तांदूळ देण्याची सोय येथील नागरिकांसाठी केली होती. कालांतराने ती संस्था अपना बाजारसारख्या संस्थेत विलीन झाली. आजही जनता केंद्रात कार्यकर्त्यांची फळी कोणतीही अपेक्षा न करता कार्यरत आहे.  

वाचनासाठीची आमची चळवळ गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात.  आमच्याकडे मोठ्या प्रमाणात विविध विषयांवरची पुस्तके आहेत. त्यात नवी भर पडत असते. मात्र, मराठी वाचनालयाचे वाचक कमी झाले आहेत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. -विश्वनाथ मलुष्टे, अध्यक्ष, जनता केंद्र व वाचनालय