मुंबई : कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आहे. येत्या काही दिवसांत त्याच्याकडे कसून चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने याच्या खासगी चालकाकडे बुधवारी पुन्हा चौकशी करण्यात आली.
राज्याचे राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. त्यामध्ये मुख्य संशयित निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेसह चौघेजण मुंबई पोलीस दलाशी संबंधित आहेत. आता ठाण्यात कार्यरत एका पोलीस निरीक्षकावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुन्ह्यात वाझे व त्याच्या सहकाऱ्यांना त्याने मदत केल्याचा संशय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाझेला २० जिलेटिनच्या कांड्या पुरविणे, ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात तो सामील असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. अन्य आरोपींचे जबाब व पुराव्यातून या बाबी स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. गुन्ह्यात त्याचा सहभाग सिद्ध झाल्यास त्याला अटक केली जाईल, असे सांगण्यात आले.
सविस्तर माहिती घेतली :
अटकेत असलेल्या निलंबित निरीक्षक सुनील मानेविरुद्ध एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे समजते. त्याच्या गाडीच्या खासगी चालकाकडे बुधवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. २५ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत मानेसोबत ताे कितीवेळ होता, या कालावधीत तो कोणाकोणाला, कोठे भेटला, याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात आली. यापूर्वी त्याच्यासह मानेच्या दोघा ऑर्डलीकडे चौकशी करण्यात आली. दरम्यान, ‘एनआयए’ने सोमवारी (दि. २६) मानेच्या मालकीची लाल रंगाची इनोव्हा व पांढरी पोलो कार जप्त केली. त्याचे मालाड येथील घर, मरोळतील सशस्त्र दल व अंधेरीतील क्राईम युनिट-११च्या कार्यालयाचीही झडती घेतली आहे.