Join us

टॅक्सीचालकांनो, तंबाखूचे व्यसन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:11 AM

तंबाखूच्या वाढत्या व्यसनामुळे भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. शहर-उपनगरातील टॅक्सीचालक बराच काळ तोंडात तंबाखू ठेवतात.

मुंबई : तंबाखूच्या वाढत्या व्यसनामुळे भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. शहर-उपनगरातील टॅक्सीचालक बराच काळ तोंडात तंबाखू ठेवतात. मात्र ही सवय चालकांच्या निरोगी आयुष्याला गंभीर धोका पोहोचवू शकते हे समजविण्यासाठी परळ येथील टाटा रुग्णालयात शनिवारी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे निमित्त साधून टॅक्सीचालकांचे तंबाखू-सिगारेटचे व्यसन सोडविण्यासाठी युनियनसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.टाटा रुग्णालयाच्या प्रिव्हेन्टिव्ह आॅन्कोलॉजी या विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये ५० टॅक्सीचालक उपस्थित होते. ‘स्मोक फ्री कॅब्स’ या उपक्रमांतर्गत टॅक्सीचालकांना धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, अशा सूचनेचा फलक लावण्याची सक्ती वाहतूक विभागाने केली होती. मात्र अजूनही ७९ टक्के टॅक्सीचालक या व्यसनांच्या गर्तेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता टॅक्सीचालकांच्या युनियनच्या साथीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.टॅक्सीचालक गाडी चालवताना सिगारेट ओढत नाहीत, त्या वेळी ते तंबाखूचा बार लावून गाडी चालवितात. मात्र भाडे नसताना, गाडी उभी असेल त्या वेळी सिगारेट ओढण्याचे प्रमाण यांच्यामध्ये अधिक आढळून येते. हे प्रमाण वाढत असल्याचे रुग्णालयाला अनेक प्रकरणांमधून दिसून आल्याचे प्रा. डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सांगितले. त्यामुळेच टॅक्सीचालकांमध्ये तंबाखू-सिगारेटच्या सेवनामुळे कर्करोग होतो हे वेळीच सांगण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.