तागडे सामाजिक न्यायमध्ये, तर जैन वस्त्रोद्योग विभागात; राजेश देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:54 AM2020-08-18T03:54:23+5:302020-08-18T03:54:29+5:30
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची १० ऑगस्टला मुख्य सचिवांच्या कार्यालयात (मंत्रालय) उपसचिव म्हणून बदली झाली. तेव्हापासून नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती.
मुंबई : राज्य शासनाने सोमवारी सहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. श्याम तागडे हे सामाजिक न्याय विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. सध्याचे सचिव पराग जैन यांची बदली वस्त्रोद्योग विभागात केली आहे. सुनील चव्हाण हे औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी असतील. ते एमएसईडीसीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून औरंगाबादलाच कार्यरत होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची १० ऑगस्टला मुख्य सचिवांच्या कार्यालयात (मंत्रालय) उपसचिव म्हणून बदली झाली. तेव्हापासून नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती.
हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांची बदली पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. आधीचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर गेल्यापासून हे पद रिक्त होते. राजेश देशमुख यांच्या जागी हाफकिनचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेमनार हे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होते. संदीप कदम हे भंडाराचे नवे जिल्हाधिकारी असतील. आतापर्यंत ते सीईटी आयुक्त म्हणून मुंबईत कार्यरत होते.