"ताई आली अन् येऊन बसली"; वंचित आघाडीने सुषमा अंधारेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:10 PM2023-09-01T22:10:07+5:302023-09-01T22:12:35+5:30
इंडिया बैठकीत वंचित बहुजन आघाडीही सहभागी घेणार असल्याचे बोलले जात होते.
मुंबई - देशभरातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी केली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडली असून या बैठकीला देशभरातून विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत ईशान्य भारतातूनही काही पक्ष सहभाग घेत असल्याचं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं. तसेच, वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर, आता वंचित बहुजन आघाडीकडून सवाल करण्यात आला आहे.
इंडिया बैठकीत वंचित बहुजन आघाडीही सहभागी घेणार असल्याचे बोलले जात होते. या चर्चांवर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रीया दिली. इंडिया आघाडीचे आम्हाला निमंत्रण नाही. आम्ही ठाकरे गटासोबत आहोत. पण, महाविकास आघाडीसोबत नाही. आम्हाला बैठकीचे निमंत्रण का दिलं नाही याचे कारण काँग्रेसला विचारले पाहिजे, काँग्रेस आम्हाला निमंत्रण देत नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, आज सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आल्याचं म्हटलं. तसेच, पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषदेतही त्याचा पुनरुच्चार केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर, आता वंचित बहुजन आघाडीकडून पलटवार करण्यात आलाय.
वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील यांनी सुषमा अंधारेंना सवाल विचारला. सुषमा अंधारेंच्या अशा राजकीय बैठकीचा किती अनुभव आहे मला माहिती नाही. पण, अशा बैठकींचं रितसर निमंत्रण देण्यात येत असतं. ते निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला आलेलं नाही, जर दिलं असेल तर कुणाला दिलं आणि कुणी दिले हेही सुषमा अंधारेंनी स्पष्ट करावं. ते पत्राने दिलं, मेलद्वारे दिलं, फोनवर दिलं की कबुतराकडून चिठ्ठी पाठवली, असा सवाल शमिभा यांनी विचारला आहे. तसेच, न बोलावता अशा बैठकींना जाणं म्हणजे ताई आली अन् येऊन बसली असं होऊ नये, असा टोलाही शभिमा यांनी अंधारेंना लगावला. वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून भाजपाच्या विरोधात आहे, ती भाजपाच्या विरोधातच राहणार आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.