लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अलीकडे महिलांना एसटी प्रवासात हाफ तिकीट आकारले जाते. असे असताना अनेक ठिकाणी तिकीट न काढताच एसटीने प्रवास करतात. पुरुषांसोबतच महिलाही तिकीट न काढता प्रवास करत असल्याचे दिसून येते. गेल्या पाच महिन्यांत फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविली. मात्र, मुंबई विभागात महिला विनातिकीट आढळून आल्या नाहीत.
राज्य परिवहन महामंडळाची बस शहरात आणि गावखेड्यात धावते. नफा तोटा हा दुसरा भाग असला तरी प्रथम प्राधान्य प्रवाशांच्या सेवेसाठी असते. हे करतानाच समाजातील विविध घटकांना एसटीकडून प्रवासात सवलतही दिली जाते.
विनातिकीट आढळल्यानंतर तिकिटाच्या दरापेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम दंड म्हणून आकारला जातो. दंडाचे सोडा अन्य प्रवाशांसमोर ‘डब्ल्यूटी’ (विनातिकीट) म्हणून अपमान होतो. हा अपमान सहन करण्यापेक्षा आणि केवळ अर्धेच तिकीट काढावे लागत असूनही महिलांनी फुकट प्रवास का करावा, असा प्रश्न आहे. राज्यात काही भागात हा प्रकार दिसून येतो; पण मुंबईत महिला प्रवासी विनातिकीट आढळत नाहीत.
तिकीट परवडले, दंड दुप्पट-तिप्पट- विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळला तर एसटी महामंडळाच्या नियमानुसार त्या प्रवाशाकडून दंड म्हणून तिकिटाची दुप्पट-तिप्पट रक्कम वसूल केली जाते. हे माहिती असूनही अनेक जण फुकट प्रवास करण्याचे धाडस करतात.
तिकीट घेऊनच करा प्रवास
- एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. विविध वर्गाला एसटी प्रवासात सवलतही दिली जाते.
- तिकिटाच्या उत्पन्नातून एसटीचे डिझेल, देखभाल, कर्मचाऱ्यांचे पगार आदींचा खर्च केला जातो.
- त्यामुळे नागरिकांनी एसटीचा प्रवास करताना तिकीट घेऊन प्रवास करावा.
तीन भरारी पथके
फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी एसटी महामंडळाची तीन भरारी पथके आहेत. ती अचानक कोणत्याही मार्गावर जाऊन बसला थांबवतात किंवा बसस्थानकावर थांबलेल्या बसमधून उतरणाऱ्या प्रवासाचे तिकीट तपासतात, तिकीट नसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते.