ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच, चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:17 AM2021-05-31T11:17:14+5:302021-05-31T11:21:09+5:30
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई - देशभरातील जनता कोविड 19 महामारीच्या संकटाला सामोरी जात असून शासन आणि प्रशासनही कामाला लागले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण पडला असून प्रशासनही हातात हात घालून काम करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी माणूसकीला हरवल्याच्या, प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घटनाही समोर येत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरची अशीच एक घटना उघडकील आणली आहे.
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एका 8 वर्षीय शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून कोविड सेंटरमधील संडास साफ करुन घेतल्याची संतापजनक घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, याप्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे.
अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा संग्रामपूर तालुका मारोड गावी शाळेच्या विलगीकरणकक्ष जिथे १५ कोविड पेशंट असतांना ८ वर्षाच्या मुलांकडून धमकावून toilet साफ करून घेतल जातयं लाज वाटली पाहिजे प्रशासनाला
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 30, 2021
विशेष म्हणजे या मुलाला धमकावून toilet साफ करून घेतलं@DrShingnespeakspic.twitter.com/X55pIg8Qtg
'अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा संग्रामपूर तालुका मारोड गावातील शाळेच्या विलगीकरण कक्षात घडला आहे. या विलगीकरण कक्षात 15 कोविड पेशंट असतांना 8 वर्षाच्या शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून संडास साफ करून घेण्यात आलं. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला,' असे म्हणत चित्रा वाघ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ट्विटमध्ये मेन्शन केलं आहे.
चित्रा वाघ यांच्या ट्विटवर काही जणांना संग्रामपूरचे स्थानिक आमदार संजय कुटे हे भाजपाचेच असल्याची आठवण वाघ यांना करुन दिली. तसेच, स्थानिक भाजपा आमदाराची जबाबदारी नाही का? असा सवालही नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.