‘ताज’ला सूट, मग मलबार हिल जलाशयाला का नाही? डागडुजी करा अन्यथा पर्यायी जागा शोधा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:36 PM2023-10-11T14:36:49+5:302023-10-11T14:37:26+5:30

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलाशयाची पुनर्बांधणी करण्याऐवजी डागडुजी करावी

Taj exempted then why not Malabar Hill Reservoir Make repairs or find an alternate location | ‘ताज’ला सूट, मग मलबार हिल जलाशयाला का नाही? डागडुजी करा अन्यथा पर्यायी जागा शोधा

‘ताज’ला सूट, मग मलबार हिल जलाशयाला का नाही? डागडुजी करा अन्यथा पर्यायी जागा शोधा

मुंबई :

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलाशयाची पुनर्बांधणी करण्याऐवजी डागडुजी करावी, अशी सूचना पालकमंत्री आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे. 

दरम्यान, ताजमहाल दुरुस्त होऊ शकतो, तर जलाशय का नाही, असा सवाल उपस्थित करून लोढा यांनी २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात मलबार हिल येथील जलाशयाची दुरुस्ती शक्य असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. 

संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी झाडे हटवण्यास विरोध केला आहे. 

तसेच जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेचे हँगिंग गार्डन पुढील ५ ते ७ वर्षांसाठी बंद ठेवावे लागणार आहे. परिणामी, पुनर्बांधणीच्या कामावरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले होते. त्यानुसार रहिवासी आणि पर्यावरणवादी यांची एक समिती आधीच स्थापन करण्यात आली आहे.

पर्यायी जागांचे भौगोलिक सर्वेक्षण करावे 
  दक्षिण मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी फक्त एका जलाशयावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे नवीन जलाशय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. 
  त्याकरिता पर्यायी जागा म्हणून हँगिंग गार्डनच्या शेजारी पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जागेचा विचार करावा अथवा सागरी किनारा मार्ग येथील जागेचा वापर करावा. 
  महानगरपालिकेने या पर्यायी जागांचे भौगोलिक सर्वेक्षण व तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून शक्यतांची पडताळणी करावी, असेही लोढा यांनी पत्रात म्हटले आहे.

काय म्हटलेय पत्रात?
  कॅबिनेट मंत्री लोढा यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीबाबत पत्र पाठवले आहे. 
  नागरिकांच्या विनंतीनुसार पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे, असे लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे. 
  जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलाशय तोडण्याऐवजी त्याची डागडुजी करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. 
  जलाशयाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी महानगरपालिका एका महिन्यात अहवाल सादर करणार असली तरी आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Taj exempted then why not Malabar Hill Reservoir Make repairs or find an alternate location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.