ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:49 PM2024-05-27T20:49:45+5:302024-05-27T20:50:17+5:30
या घटनेला गांभीर्याने घेत पोलिसांनी ताज हॉटेल आणि विमानतळाची झाडाझडती घेतली.
मुंबई: मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल (Mumbai Police Threat Call) आल्याची घटना घडली आहे. सोमवारी(दि.27) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन प्रसिद्ध ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या कॉलमुळे पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. याला गांभीर्याने घेत पोलिसांच्या पथकाने ताज हॉटेल आणि विमानतळाची झाडाझडती घेतली, पण कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
Mumbai Police control room today received a call that a bombs have been placed at Taj Hotel and airport in the city. Police conducted search at the locations but nothing suspicious was found. The call originated from Uttar Pradesh and search for the caller is underway: Mumbai…
— ANI (@ANI) May 27, 2024
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल उत्तर प्रदेशातून आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. पण, तपासादरम्यान त्या ठिकाणी काहीही सापडले नाही. सध्या कॉल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
या आधीही आला होता कॉल
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा कॉलवर कधी गेटवे ऑफ इंडिया तर कधी विमानतळ उडवण्याच्या धमक्या येत असतात. एवढेच नाही तर कधी कधी एखाद्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारे फोनही मुंबई पोलिसांकडे येतात. याआधीही अज्ञात कॉलरने मुंबई पोलिसांना अलर्ट करत 350 किलो आरडीएक्स पाकिस्तानहून मुंबईत आले असून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पण, तेव्हाही तपासात काही सापडले नाही.