मुंबई : कुलाबा येथील रस्ता व पदपथावर गेल्या १२ वर्षांपासून अतिक्रमण करणाऱ्या ताज हॉटेलचे नऊ कोटींचे शुल्क महापालिकेने माफ केले. या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शविला होता. मात्र, विरोधी पक्षांचा आक्षेप डावलून बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ताज व्यवस्थापनाने हॉटेलसमोरील रस्त्यावर बॅरिकेट्स उभे केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थापनाने हे बॅरिकेट्स उभे केल्याचा युक्तिवाद व्यवस्थापनाकडून केला जात होता. या रस्त्याच्या डागडुजीपासून नूतनीकरणाचे काम हॉटेलमार्फत होत आहे. मात्र, या रस्त्याचा खासगी वापर होत असल्याने त्या बदल्यात नऊ कोटी रुपये देण्याची सूचना पालिका प्रशासनाने संबंधित व्यवस्थापनाला केली होती.
आता १२ वर्षांनंतर हे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर बुधवारी आणला. याप्रकरणी रस्ते आणि पदपथाबाबत महापालिकेने आपले धोरण स्पष्ट करावे, अशी सूचना लोकायुक्तांनी केली होती. त्यामुळे ताज हॉटेलला सूट देण्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असे विरोधी पक्षांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. परंतु, बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेनेने ताज हॉटेलचे नऊ कोटी रुपये शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
लोकायुक्तांकडे मागणार विरोधी पक्ष दाद
राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीने महापालिकेत आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ताज हॉटेलचे नऊ कोटी रुपये शुल्क माफ करणारी शिवसेना केवळ श्रीमंतांसाठी काम करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. तसेच ताज हॉटेलला सूट देण्याच्या निर्णयाविरोधात लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.