ताजमहाल हॉटेलला कडेकोट सुरक्षेचा वेढा; तळमजल्यावर अत्याधुनिक वॉर रूम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:07 AM2018-11-22T05:07:29+5:302018-11-22T05:07:58+5:30
कुलाब्याच्या गेट वे आॅफ इंडियाच्या समोर ताजमहाल हॉटेल आहे. २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहाल हॉटेलचे सर्वांत जास्त आर्थिक नुकसान झाले होते.
मुंबई : कुलाब्याच्या गेट वे आॅफ इंडियाच्या समोर ताजमहाल हॉटेल आहे. २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहाल हॉटेलचे सर्वांत जास्त आर्थिक नुकसान झाले होते. परदेशी नागरिकांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांनी या पंचतारांकित हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. जवळपास तीन दिवस सुरू असलेल्या या धुमश्चक्रीत काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. आता या हल्ल्याला १० वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यान, ताज हॉटेलही पुन्हा दिमाखात सुरू झाले आहे. या हल्ल्याच्या जखमा अजून तशाच असल्या तरी हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मात्र अतिशय कडेकोट आणि चोख ठेवण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईच्या टोकावर आणि समुद्राला लागून असलेल्या ताज हॉटेलमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सेलिब्रेटी, परदेशी नागरिक वास्तव्यास असतात. गेट वे आॅफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. या दोन वेगवेगळ्या इमारती दिसत असल्या तरी दोन्ही इमारती ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांतच हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले. हल्ल्याच्या १० वर्षांनंतर अशी परिस्थिती परत उद्भवू नये म्हणून सुरक्षारक्षकांची भक्कम फौज हॉटेलच्या चहूबाजूंनी उभी करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अतिशय कसून तपासणी केली जाते. त्यांनी आणलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी सुरक्षेविषयीची अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. ताजच्या प्रवेशद्वारासमोर अत्याधुनिक शस्त्रांसह सुरक्षारक्षकांची कुमक सदैव तैनात असते. ते डोळ्यांत तेल घालून २४ तास या परिसराचा पहारा करीत असतात. हॉटेलच्या आतल्या भागातही सुसज्ज अशी सीसीटीव्ही कॅमेºयांची यंत्रणा आहे. हॉटेलच्या तळमजल्यावर एक अत्याधुनिक वॉर रूम तयार करण्यात आली असून येथे २४ तास सीसीटीव्हीवरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येते.
हॉटेलच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असली तरी येथील कर्मचाºयांच्या मनात १० वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मात्र त्या वेळी जशी वेळ आली तशी पुन्हा आल्यास आम्ही सज्ज आहोत, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. मात्र, दहशतवादी हल्ला पुन्हा कधीच होऊ नये अशीच येथील प्रत्येकाची धारणा आहे.
‘त्या’ हॉटेलची सुरक्षा तशी चांगली, पण...
नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट/ओबेरॉय हॉटेलला २६/११ च्या हल्ल्याची मोठी झळ बसली. आता या हॉटेलने अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये प्रवेश करू शकणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. मात्र, येथील सुरक्षा काटेकोर असली तरी हॉटेलच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाºयावर आहे.
ॅहॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अगदी आतील भागापर्यंत सीसीटीव्हीसह प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची फौज तैनात आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्र्रत्येक एन्ट्री पॉइंटला कर्मचारी, सुरक्षा विषयक साधने सज्ज आहेत. मात्र, प्रवेशद्वारावरील प्रमुख परिसर वगळता लगतच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याचे चित्र आहे.