मुंबई - मुंबई आणि उपनगरात गाड्यांमधून मोबाईल पळवणाऱ्या टकटक गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजपर्यंत सर्वसामान्य या गँगचे शिकार होत होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या पर्सवर या गँगने डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी ज्या कारमधून पर्स लंपास केली ती एक पोलीस कार होती.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी असलेल्या निधी कामदार यांची पर्स आणि मोबाईल चोरीला गेला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीजवळ 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. निधी कामदार या कुल्याब्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधून परतत असताना त्या एका दुकानासमोर थांबल्या. निधी या एका पोलीस कॉन्स्टेबल सोबत पोलिसांच्या वाहनाने प्रवास करत होत्या. दुकानामध्ये जाताना त्यांनी त्यांची पर्स आणि मोबाईल हा कारमध्येच ठेवला.
पोलिसांच्या गाडीच्या बाजूला अचानक एक व्यक्ती आली आणि रस्त्यावर पैसे पडल्याचं कारमधील पोलिसांना सांगितलं. नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी पोलिसांनी कारची काच खाली केली. हिच संधी साधत चोरट्यांनी कामदार यांची पर्स आणि मोबाईल लंपास केला आणि ते पसार झाले. चोरीचा हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र टकटक गँगचे सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस चालकाने कुलाबा पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात चोरीची घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच टकटक गँगला पकडण्यासाठी तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. निधी कामदार या नागपूरच्या असून त्या मुख्यमंत्री कार्यालयात सोशल मीडिया प्रमुख आहेत. चोरीच्या या घटनेबाबत कामदार यांना विचारले असता मोबाईल चोरीला गेल्यामुळे थोडी भीती होती. मात्र आता त्यांनी सर्व ठिक असल्याचं म्हटलं आहे. चोरी झाली त्या दिवशी निधी पोलिसांच्या गाडीने पोलीस चालकासोबत प्रवास करत होत्या.