नववर्षात नऊ वेळा काढा पिकनिक
By admin | Published: January 1, 2015 03:15 AM2015-01-01T03:15:01+5:302015-01-01T03:15:01+5:30
नव्या वर्षात असलेल्या २५ सार्वजनिक सुट्यांमुळे नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चेतन ननावरे - मुंबई
नव्या वर्षात असलेल्या २५ सार्वजनिक सुट्यांमुळे नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यात भर म्हणजे वर्षातील १२ महिन्यांपैकी नऊ महिन्यांत सार्वजनिक सुट्या वीकेन्डला जोडून आल्याने लोकांनी आतापासूनच पुढील वर्षातील पिकनिकचे प्लॅनिंग सुरू केले आहे.
नव्या वर्षात फेब्रुवारी, जून, आणि आॅगस्ट महिना वगळता इतर सर्व महिन्यांतील सार्वजनिक सुट्या या शनिवार व रविवारला जोडून आलेल्या आहेत. त्यामुळे पिकनिकला एखाद्या दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे. छोटेखानी सुटी मिळणाऱ्या नोकरदार वर्गाला नेहमीच किमान तीन ते चार दिवसांची सुटी मिळावी, अशी इच्छा असते. दूरवरच्या प्रवासासाठी किमान तीन दिवसांहून अधिक सुटी मिळणे गरजेचे असते, तरच प्रवासाचा आनंद घेता येतो. मात्र नव्या वर्षात आलेल्या सलग सुट्यांमुळे नोकरदार वर्गाची ही तक्रार दूर होणार आहे.
जानेवारी २०१५
२४, २५, २६
जानेवारी महिन्यात २४, २५ व २६ जानेवारी अशी सलग तीन दिवसांची सुटी आहे. त्यात २४ व २५ जानेवारीला शनिवार व रविवार आहे. तर देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीला सोमवार आहे.
मार्च २०१५
५, ६, ७, ८
मार्च महिन्यात ७ व ८ तारखेला शनिवार व रविवार आहे. तर ५ तारखेला होळी आणि ६ तारखेला रंगपंचमीचा सण आहे. त्यामुळे सलग चार दिवसांची सुटी चाकरमान्यांना मिळणार आहे.
एप्रिल २०१५
३, ४, ५
एप्रिलमध्ये ३ तारखेला गुड फ्रायडेची सार्वजनिक सुटी असून, ४ व ५ तारखेला शनिवार व रविवार आहे. त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सुटीचा आनंद घेता येईल.
मे २०१५
१, २, ३
महाराष्ट्र दिन ही १ मेची सार्वजनिक सुटी यंदा शुक्रवारी आली आहे. त्यामुळे २ व ३ तारखेला शनिवार व रविवारची सुटी असल्याने पुन्हा एकदा तीन दिवसांची सुटी अनुभवता येईल.
जुलै २०१५
२५, २६, २७
जुलै महिन्यातील २५ व २६ तारखेला शनिवार व रविवार असून, २७ तारखेला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी मिळते.
सप्टेंबर २०१५
१७, १९, २०
सप्टेंबर महिन्यात एक दिवसाआड आलेल्या सुटीमुळे जर एक रजा घेतली, तर सलग चार दिवसांच्या सुटीचा आनंद घेता येणार आहे. गुरुवारी १७ तारखेला श्रीगणेश चतुर्थीची सार्वजनिक सुटी असून, १८ सप्टेंबरला रजा घेतल्यास १९ व २० सप्टेंबर रोजी असलेल्या शनिवार व रविवारमुळे सलग चार दिवस सुटीची मजा लुटता येणार आहे.
आॅक्टोबर २०१५
२, ३, ४
२ आॅक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी यंदा शुक्रवारी आहे. त्यामुळे ३ व ४ तारखेला येणाऱ्या शनिवार व रविवारमुळे सलग तीन दिवस सुटी आहे.
१०, ११, १२, १३
आॅक्टोबर महिन्यात १० व ११ तारखेला शनिवार व रविवार असून, १३ तारखेला मंगळवारी घटस्थापनेची सार्वजनिक सुटी असते. त्यामुळे सोमवारजी एक रजा घेतली, तर सलग चार दिवसांची मोठी सुटी घेता येईल.
२२, २३, २४, २५
घटस्थापनेप्रमाणेच घट उठताना म्हणजेच दसऱ्याला सार्वजनिक सुटी असते. २२ तारखेला गुरुवारी दसरा असून शुक्रवारी २३ तारखेला रजा घेतली, तर २४ व २५ तारखेच्या शनिवार व रविवारची सलग चार दिवसांच्या रजेचा आनंद घेता येईल.
नोव्हेंबर २०१५
७, ८, ९, ११, १२, १४, १५
नोव्हेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने नोकरदार वर्गाची दिवाळी होणार आहे. दिवाळीत ९ तारखेला धनत्रयोदशी, ११ तारखेला लक्ष्मी पूजन व १२ तारखेला पाडवा (बलिप्रतिपदा) अशी तीन मराठमोळ््या सणांची सार्वजनिक सुटी कार्यालयीन कामाकाजाच्या दिवसांत आहे. म्हणजेच सोमवार, बुधवार व गुरुवारी सार्वजनिक सुटी आहे. परिणामी १० व १३ असे दोन दिवस रजा घेतल्यास सलग ९ दिवसांच्या सुटीचा उपभोग घेता येणार आहे.
डिसेंबर २०१५
२५, २६, १७
२५ डिसेंबरला ख्रिसमस दिवशी शुक्रवार आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार व रविवारमुळे सलग तीन दिवस सुटी मिळेल आणि वर्षाचा शेवटही गोड होईल, यात तिळमात्र शंका नाही.