Join us  

पर्यूषण पर्वात मांसविक्री बंदीबाबत निर्णय घ्या; कोर्टाकडून महापालिकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:09 PM

याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यूषण काळात प्राण्यांची कत्तल, मांस विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्यासंदर्भात जैन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या निवेदनावर तातडीने निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांना गुरुवारी दिले.शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटेबल ट्रस्टने  ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधील प्राण्यांची कत्तल, मांसविक्री  आणि खरेदीवर बंदी घालण्यात यावी, असे निवेदन मुंबई, पुणे, मीरा-भाईंदर आणि नाशिक महापालिकांना दिले आहे. 

या निवेदनावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना द्यावेत, यासाठी जैन ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

जैन धर्मासाठी हानिकारक-  जैन चॅरिटेबल ट्रस्टने याचिकेत जैन धर्मातील काही तत्त्वांचा उल्लेख केला आहे. - अहिंसेला’ जैन धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे पर्यूषणच्या काळात प्राण्यांची कत्तल करण्यात आली तर ते जैन धर्मासाठी हानिकारक आहे, असे याचिकेत म्हटले आहे. 

लवकर निर्णय घ्या ट्रस्टने केलेल्या विनंतीनुसार, महापालिकांना त्यांच्या निवेदनावर जलदगतीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यास हरकत नाही, असे म्हणत न्यायालयाने मुंबई, पुणे, मीरा-भाईंदर आणि नाशिक महापालिकांना ट्रस्टच्या निवेदनावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट