सेल्फी घ्या, ‘सीएम’सोबत भोजन करा; विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:16 AM2024-02-19T10:16:43+5:302024-02-19T10:22:44+5:30
बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह पालक, विद्यार्थ्यांना सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
मुंबई : राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह पालक, विद्यार्थ्यांना सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शैक्षणिक घोषवाक्य स्वहस्ताक्षरात लिहून तेही अपलोड करण्याचेही आवाहन केले आहे. या दोन स्वतंत्र उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसह कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत स्नेहभोजन करता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात सुमारे एक लाख सरकारी व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला आहे.
या उपक्रमांतर्गतच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र दोन कोटी ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
या पत्रात त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला आहे. या पत्रासह मुलांना आणि पालकांना सेल्फी काढायची आहे.
२५ फेब्रुवारीपर्यंत मुदत या तिन्ही उपक्रमांकरिता २५ फेब्रुवारी ही मुदत असेल. त्यासाठी आधी https://www.mahacmletter.in/ या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. आणि त्यानंतर व्हिडीओ अपलोड करायचे आहेत.
वाचन प्रतिज्ञा :
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाचनाची सवय वृद्धिंगत होण्याकरिता वाचन सवय प्रतिज्ञा घ्यावयाची आहे. यात दररोज रात्री दोन पाने वाचून झोपेन, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना घ्यावयाची आहे. संकेतस्थळावर ही देखील अपलोड करायची आहे.