मुंबई : कर्मचारी संघटनांनी वीजहानी कमी करण्यासाठी विचार करावा. वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीजहानी १५ टक्क्यांवर कशी आणणार याचा प्रस्ताव द्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर पुन्हा चर्चा करू; तोपर्यंत फ्रेंचाईझीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना दिली.कर्मचारी संघटनांच्या दोन्ही गटांशी ऊर्जामंत्र्यांनी फ्रेंचाईझीबाबत नुकतीच चर्चा केली. संपाची नोटीस कर्मचारी संघटनांच्या एका गटाने दिली होती. या बैठकीत दोन्ही गटांतील संघटनांनी वसुली वाढवू तसेच वीजहानी १५ टक्क्यांवर आणण्याचे आश्वासन दिले. तर बावनकुळे म्हणाले की, कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसारच यापूर्वी औरंगाबाद, जळगाव येथील फ्रेंचाईझीचा निर्णय रद्द केला. मात्र शीळ, मुंब्रा, अकोला, मालेगाव येथील स्थिती अत्यंत खराब आहे. ५२ टक्क्यांवर वीजहानी पोहोचली आहे. अशा स्थितीत वीजपुरवठा करणे शक्य होणार नाही.संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यंत्रणा पुरवा, सुरक्षा द्या, आम्ही वीजहानी कमी करून दाखवू. शिवाय २६ व २७ मार्चचा संप मागे घेतल्याची घोषणाही त्यांनी केली.बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी उपस्थित होते. एका गटातील संघटनांचे राजन भानुशाली, राकेश जाधव तर दुसºया गटातील संघटनांचे शंकर पहाडे, मोहन शर्मा, सुनील जगताप जहीरुद्दीन, एन.बी. जारोंडे, आर.टी. देवकांत, कृष्णा भोयर उपस्थित होते.
वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीजहानी १५ टक्क्यांपर्यंत आणा - ऊर्जामंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:02 AM