‘टूलकिट’प्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:09+5:302021-05-28T04:06:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टूलकिटप्रकरणी काँग्रेसची बदनामी करण्याचा डाव भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. खड्डा, प्रवक्ते संबित पात्रा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टूलकिटप्रकरणी काँग्रेसची बदनामी करण्याचा डाव भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. खड्डा, प्रवक्ते संबित पात्रा, मंत्री स्मृती इराणी यांनी आखला आहे. सोशल मीडियावर काँग्रेसची बदनामी करून, पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असून, त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी भाई जगताप म्हणाले की, भाजप नेत्यांनी मुंबई काँग्रेसचे सोशल मीडियाचे काम करणाऱ्या आमच्या टीमचे लेटरहेड हस्तगत केले. त्यावर बनावट मजकूर टाकून ते गैरपद्धतीने ट्विटर अपलोड करण्यात आला. अपलोड केलेले कागदपत्रे व मजकूर बनावट असल्याचे ट्विटरनेसुद्धा मान्य केले आहे. तर याप्रकरणी सायबर सेलशी चर्चा करून, त्याची पूर्ण शहानिशा करून त्यानुसार आम्ही कारवाईला करू, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.