मुंबईतील गर्दीवर कोरोना नियमानुसार कारवाई करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:19 AM2021-03-16T09:19:05+5:302021-03-16T09:19:29+5:30
मुंबईतील रुग्णालय, डम्पिंग ग्राऊंडची समस्या, झोपडीधारकांचे पुनर्वसन, नदी-नाल्यांचे रुंदीकरण अशा विविध प्रश्नांवर विधान परिषदेचे आमदार व काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आयुक्तांची भेट घेतली.
मुंबई: पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः नियमित घेत असताना आता काँग्रेस पधिकाऱ्यांनीही रखडलेल्या प्रकल्पांकडे लक्ष वेधले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील रखडलेले प्रकल्प आणि समस्या मांडल्या. त्याचबरोबर मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असताना पश्चिम उपनगरातील डी मार्टसारख्या मॉलमधील गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईतील रुग्णालय, डम्पिंग ग्राऊंडची समस्या, झोपडीधारकांचे पुनर्वसन, नदी-नाल्यांचे रुंदीकरण अशा विविध प्रश्नांवर विधान परिषदेचे आमदार व काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डी मार्टमधील गर्दीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणांवर कोरोना नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच मुंबईत दररोज ६,५०० ते ६,८०० मे. टन कचरा देवनार, कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा येथे मुंबईतील कचरा टाकण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध होत असलेल्या ५२ हेक्टर जागेपैकी ३० हेक्टर जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. उर्वरित जागाही त्वरित ताब्यात घेऊन तेथे टाकलेल्या कचऱ्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करावी, असे त्यांनी सुचवले.
‘प्रकल्प अडविणाऱ्यांना शोधा’
पालिका प्रशासन २०१७ पर्यंत मुंबईत काही ठिकाणी सांडपाणी, मलयुक्त जलावर प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडणे अपेक्षित असताना आज २०२१ साल व मार्च महिना उजाडला तरी प्रकल्पाची अंमलबजावणी झालेली नाही. हे प्रकल्प अडविणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, कोणामुळे हे प्रकल्प रखडले, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.