नालेसफाई घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा !
By Admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:48+5:302015-12-05T09:07:48+5:30
मुंबईतील नालेसफाईच्या कामात ७० टक्के गैरप्रकार झाला असल्याचे सांगत पालिका आयुक्तांनी आपला अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. नालेसफाईच्या नावाखाली पालिकेची
मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामात ७० टक्के गैरप्रकार झाला असल्याचे सांगत पालिका आयुक्तांनी आपला अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. नालेसफाईच्या नावाखाली पालिकेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली असून, या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करावी; तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
नालेसफाईच्या ३२ कंत्राटांपैकी गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या एकूण ५७,५६१ फेऱ्यांसाठी वापरण्यात आलेल्या २३,८०० लॉगशीटमधील नोंदींसोबत जोडलेल्या व्हीटीएस प्रपत्रातील माहिती आणि वजनकाटा पावतीच्या नोंदींमध्ये फसवणूक करण्यात आली. शिवाय गाळ
वाहून नेण्याच्या कामातील
वाहन फेऱ्यांमध्येही महापालिकेची फसवणूक झाली.
तसेच कंत्राटातील अटींचाही भंग झाल्याचे आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीला दिसून आले आहे. ज्या वजन काट्यावर गाळ मोजला त्या पावत्या कंत्राटदार सादर करू
शकलेले नाहीत. एकाच लॉगशीटवर एकापेक्षा अधिक फेऱ्या दर्शविण्यात आल्या आहेत. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या ७० टक्के फेऱ्या बोगस दाखविण्यात आल्या असून, गाळ
कुठे टाकला, गाळाचे मोजमाप याबाबत संपूर्ण घोळ असल्याचे उघड झाले आहे. आयुक्तांच्या अहवालामुळे नालेसफाईतील सत्य जनतेसमोर आले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. तसेच या चौकशी समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून नव्याने कंत्राटपद्धती अवलंबावी, अशी भूमिकाही शेलार यांनी मांडली.
अहवालात फसवणुकीची माहिती
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई आणि त्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेला येतो. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका आयुक्तांच्या निगराणीत या विषयाच्या चौकशीची घोषणा केली होती.
आयुक्तांनी चौकशी समिती स्थापन करून त्याचा सविस्तर अहवाल गुरुवारी स्थायी समितीला सादर केला. आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार पालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप शेलार यांनी केला.
संगणकांतील नोंदीत फसवणूक
३२ कंत्राटांपैकी गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या ५७ हजार ५६१ वाहन फेऱ्यांसाठी वापरण्यात आलेल्या सुमारे २३ हजार ८०० लॉगशीटमधील नोंदींसोबत जोडलेल्या व्हीटीएस प्रपत्रातील माहिती आणि वजनकाटा पावतीच्या नोंदी संगणकामध्ये नोंदवण्यात आल्या. यामध्ये ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.