Join us

‘आयआयटी’तील ‘त्या’ प्राध्यापिकेवर कारवाई करा - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उच्च शिक्षणासाठी देशात नावाजलेल्या आयआयटी खरगपूर विद्यापीठातील प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आणि आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उच्च शिक्षणासाठी देशात नावाजलेल्या आयआयटी खरगपूर विद्यापीठातील प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना जातिवाचक अपशब्द वापरून सर्वच दलितांचा अवमान केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ‘आरपीआय’चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. यासाठी त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह खरगपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि खरगपूरचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्र पाठविले आहे.

खरगपूर विद्यापीठाच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना राष्ट्रगीताची घोषणा झाली. त्यावेळी यांतील काही दलित, आदिवासी विद्यार्थी राष्ट्रगीतासाठी उभे राहिले नाहीत. तसेच त्यांनी ‘भारतमाता की जय’ही म्हटले नाही. त्यामुळे प्रा. सीमा सिंग रागावल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रगीतावेळी उभे राहिलेच पाहिजे, तसेच प्रत्येक भारतीयाने ‘भारतमाता की जय म्हटलेच पाहिजे.’ तसे जर या दलित, आदिवासी विद्यार्थ्यांनी केले नसेल तर ती त्यांची चूक आहे. मात्र ऑनलाइन वर्ग सुरू असताना या दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याबाबत समजले नसेल. राष्ट्रगीतावेळी ते उभे राहिले नाहीत ही या दलित आदिवासी विद्यार्थ्यांची चूक आहे. मात्र या चुकीवरून संबंधित प्राध्यापिका सीमा सिंग यांनी दलित, आदिवासींच्या मातापित्यांना बास्टर्ड असे अपशब्द वापरणे; जातिवाचक शिवीगाळ करणे निषेधार्ह आहे. भारतीय संविधानाने जातिभेद नष्ट केला आहे. जातीय द्वेषातून सिंग यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या शिवीगाळप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी आठवले यांनी केली.

..........................