‘रहेजा महाविद्यालयावर कारवाई करणार’
By admin | Published: July 24, 2016 03:20 AM2016-07-24T03:20:04+5:302016-07-24T03:20:04+5:30
जागेच्या अभावाचे कारण देत अभ्यासक्रम बंद करणे आणि विकासच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फी उकळणे; याविरोधात एल.एस. रहेजा महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल
मुंबई : जागेच्या अभावाचे कारण देत अभ्यासक्रम बंद करणे आणि विकासच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फी उकळणे; याविरोधात एल.एस. रहेजा महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कला संचालक राजीव मिश्रा यांनी विद्यार्थी भारतीला दिले आहे.
वांद्रे येथील एल.एस. रहेजा महाविद्यालय विकास फी च्या नावाखाली १० हजार रुपये आकारत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी संघटनेकडे केली होती. रहेजा महाविद्यालयाने फाऊंडेशन आणि फाईन आर्ट हे अभ्यासक्रम जागेच्या अभावाचे कारण देत बंद केले होते. या विरोधात विद्यार्थी भारतीने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत कला संचालक राजीव मिश्रा यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीचा अहवाल आला असून त्यात जागा असूनही अभ्यासक्रम सुरु करण्यात आला नाही, असे नमुद करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय विकास फीच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून १० हजार रुपये आकारण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सोमवारी कला संचालनालयाकडून शासनासह संस्थेला रहेजा महाविद्यालयातील गैरप्रकाराबाबतचे पत्र धाडले जाणार आहे. आणि या पत्रात महाविद्यालयातील निर्णयासाठी प्रशासक नेमावा, अशी मागणी करण्यात येणार आहे, असे संघटनेच्या कार्याध्यक्ष स्मिता साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)