Join us

राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा!

By admin | Published: March 11, 2016 3:03 AM

‘एका उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी ७0 हजार रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या रिक्षा रस्त्यावर येताच जाळून टाका,’ असे वक्तव्य करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजकीय

मुंबई : ‘एका उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी ७0 हजार रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या रिक्षा रस्त्यावर येताच जाळून टाका,’ असे वक्तव्य करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजकीय पक्ष आणि मुंबईतील रिक्षा युनियनकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याचे प्रयत्न झाल्यास ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी दिला आहे. तर प्रक्षोभक वक्तव्यासाठी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मुंबईतील रिक्षा युनियननेही राज यांचे वक्तव्य बेजबाबदार असल्याची टीका केली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार परिवहन विभागाने लॉटरी पद्धतीने रिक्षा परवाना मिळालेल्या ४२ हजार यशस्वी उमेदवारांची मराठीची परीक्षा नुकतीच घेतली. याविषयी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मुलांनाच रिक्षा, टॅक्सीचे परवाने मिळाले पाहिजेत, ही मागणी केली. देण्यात येणारे ७0 हजार रिक्षा परवाने ७0 टक्के परप्रांतीयांना देण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्यासाठी रिक्षा बनविणाऱ्या बजाज कंपनीने कोट्यवधींचा व्यवहारही केल्याचा आरोप करत नव्याने येणाऱ्या रिक्षा जाळून टाका, असा आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या वक्तव्याचा राजकीय पक्षांकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.१५ वर्षे वास्तव्याचा आणि पोलिसांचा चारित्र्य पडताळणीचा दाखला परिवहन विभागाकडून मोडीत काढण्यात येत आहे. हे दाखले कधीही घेण्यात येणार असल्याचेही मनसे अध्यक्षांकडून सांगण्यात आले. मात्र परिवहन विभागाकडून कोणताही नियम मोडला जाणार नाही. जो नियम पूर्वीपासून आहे, तो यापुढेही लागू राहील, असे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. योग्यप्रकारे परवान्यांचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.> मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजपा आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयाबाहेरील पोस्टर्स फाडून त्याला काळे फासले. ‘राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावे’, असे वक्तव्य सागर यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यानी हे पाऊल उचलल्याचे आमदार योगेश सागर यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आ. सागर यांच्या कार्यालयाबाहेरील पोस्टर्स फाडून त्याला काळे फासले व प्रतीकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर त्यांनी पळ काढला. तपास सुरू असल्याची माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी दिली. ‘राज ठाकरे यांच्या वक्तव्याविरुद्ध प्रतिक्रिया दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले असावे, पोलीस याचा शोध घेतील.’ असे आमदार योगेश सागर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. > मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही समाजामध्ये दुही माजविणाऱ्या या वक्तव्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. काँग्रेसकडून याचा तीव्र निषेध केला जात आहे. मुंबई, महाराष्ट्रात राहणाऱ्या भूमिपुत्रांना रोजगार आणि आॅटो परमिट मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे, मात्र १५ वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहणाऱ्यांना व आॅनलाइन लॉटरीत आॅटो परमिटसाठी पात्र असलेल्या युवकांना शासन नियमांच्या अधीन राहून परमिट मिळालेच पाहिजे, असेही निरुपम म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यांना ज्ञान नाही हेच दिसून आले. राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनही देऊ. त्याचप्रमाणे पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था सांभाळावी. - शशांक राव, मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन-अध्यक्ष