Join us

'जात, धर्म न पाहता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर आरोपींवर कारवाई करा'; आदित्य ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:08 IST

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मोठ्या वादात सापडले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला भरती करून घेण्यास नकार दिला यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाने आधी १० लाख रुपये भरण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 'रुग्णालयातील डॉक्टरांची जात, धर्म न पाहता आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा', अशी मागणी ठाकरेंनी केली. 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, माणसाच्या जाती-धर्माच्या पलिकडेही माणुसकी नावाची गोष्ट असते. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे आरोपींची जात-धर्म न पाहता त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी ठाकरेंनी केला." राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे वेगवेगळे वैद्यकीय कक्ष आहेत. पण याचा उपयोग काय? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाऊनही दखल घेतली नाही. रुग्णालयातील प्रशासन मग्रुर का आहे याचे उत्तर सरकारने द्यावे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

"लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय...", राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

"मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णालयाच्या प्रशासनाला अनेक फोन गेले. पण कोणाचाही फोन येऊ दे, दहा लाक भरल्याशिवाय अॅडमिट करुन द्यायचे नाही असा आदेश देण्यात आला. हे कृत्य माणूसकीला काळीमा फासणारं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

'जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल'

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत समितीही नेमली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची पुण्यात भेट घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे. मी नेमलेल्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही. तोपर्यंत आता तरी बोलणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. हॉस्पिटलबाहेर सातत्याने विविध पक्ष, संघटना आंदोलन करत आहेत. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चुकीचे आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनादेवेंद्र फडणवीसदीनानाथ मंगेशकर रुग्णालय