‘त्या’ पोलिसांच्या आंतर जिल्हा बदलीची कार्यवाही करा, डीजींचे घटक प्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:26 PM2017-11-07T19:26:25+5:302017-11-07T19:26:38+5:30

 राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आंतर जिल्हा बदलीबाबतच्या  विनंती अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत.

Take action against those 'inter-district' police, ordering DGP's constituents | ‘त्या’ पोलिसांच्या आंतर जिल्हा बदलीची कार्यवाही करा, डीजींचे घटक प्रमुखांना आदेश

‘त्या’ पोलिसांच्या आंतर जिल्हा बदलीची कार्यवाही करा, डीजींचे घटक प्रमुखांना आदेश

googlenewsNext

- जमीर काझी
मुंबई :  राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आंतर जिल्हा बदलीबाबतच्या  विनंती अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बदलीसाठी इच्छुक असलेल्या हजारो पोलिसांच्या इच्छापूर्ती लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटक बदलीसाठी निर्धारित केलेल्या निकषांच्या आधारावर त्यांच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी घटकप्रमुखांना दिले आहेत. या प्रलंबित प्रस्तावाचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.
  
पोलीस दलात २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना तीन आवश्यक बाबींच्या निकषावर आंतर जिल्हा बदली करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने १९ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्याबाबतचा प्रस्ताव महासंचालकांनी विभागाने एक वर्षापूर्वी पाठविला होता. आता मंत्रालयातून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर  माथूर यांनी त्याबाबतचा निर्णय घटकप्रमुखांनी घेण्यास सांगितले आहे. 

२०११ नंतर ज्या पोलीस घटकात  उमेदवाराची नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य घटकामध्ये आंतरजिल्हा बदली करावयाची नाही, असा धोरणात्मक नियम सरकारने घेतला होता. तशी अट उमेदवारांच्या नियुक्ती पत्रामध्ये नमूद करण्यात आली होती. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व मागास भागातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात उमेदवार भरती झालेले आहेत. त्यांच्या नोकरीची समस्या दूर झाली तरी गावी रहात असलेले वृद्ध पालक आणि तेथील अन्य अडचणी प्रकर्षाने भेडसावू लागल्या, तसेच अनेक  पुरुष किंवा महिला पोलिसांचे  जोडीदार अन्य जिल्ह्यामध्ये  नोकरीला आहेत. त्यांना स्वतंत्र रहावे लागत असल्याने त्याचा  मानसिक परिणाम  पोलिसांच्या कामावर होवू लागला आहे. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होवू लागल्याने पोलीस महासंचालकांनी ही अट रद्द करुन त्यांनाही आंतर जिल्हा बदलीसाठी ग्रहित धरले जावे, असा प्रस्ताव   २८ आॅक्टोंबरला गृह विभागाकडे पाठविला होता.   
 -------------
 २०११ नंतर सुमारे २० हजार पोलिसांची भरती झाली आहे. गृह विभागाच्या मंजुरीमुळे त्यांच्या नियुक्तीतील नियम ३(२),(अ)उपखंड(अ)च्या अधून राहून इतर पोलीस घटकामध्ये बदलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठीची पात्रता,त्याची प्रक्रिया, सक्षम प्राधिकारी, सेवा जेष्ठता आदी निकषावर त्यांची इच्छुक घटकात बदलीचा निर्णय महासंचालकातर्फे घेतला जाणार आहे. 
------------
  कोणाला मिळणार प्राधान्य
 आंतर जिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्यांची मूळ घटकात किमान तीन वर्षे सेवा झाली पाहिजे, त्याचबरोबर पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असणे, या निकषावर त्यांच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल. 
------------
अशी होणार प्रक्रिया 
  इच्छुक पोलिसांनी मूळ घटकप्रमुखांकडे आवश्यक अटीची पूर्तता व कागदपत्राच्या प्रतीसह अर्ज केल्यानंतर त्याची एक प्रत ज्या घटकामध्ये बदलून जायचे आहे, त्याठिकाणच्या घटकप्रमुखाकडे माहितीसाठी पाठवावयाची आहे. या अर्जावर पोलीस आयुक्त/ अधीक्षक हा अर्ज आस्थापन मंडळासमोर ठेवतील. आवश्यक छाननीनंतर त्याच्या पात्र-अपात्रतेबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेतला जाईल. पात्र अर्ज पोलीस इच्छुक असलेल्या संबंधित घटकप्रमुखाकडे  पाठवतील. त्यांनी त्याबाबत एका महिन्याच्या आत त्याबाबतचा संमतीपत्र पाठवावयाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या पोलिसांचे अर्ज अमान्य करण्यात आले आहेत, त्यामागील कारणासहित संबंधित पोलिसाला माहिती द्यावयाची आहे. 

Web Title: Take action against those 'inter-district' police, ordering DGP's constituents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस