देवेंद्र फडणवीस यांच्यावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपाचे पोलीस आयुक्तांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 22:16 IST2020-05-02T22:13:20+5:302020-05-02T22:16:17+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची शिष्टमंडळाने शनिवारी भेट घेऊन ही मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपाचे पोलीस आयुक्तांना साकडे
मुंबई - माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टिका करणारे तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच पोलिसांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कोव्हीड-१९ योध्दांवर हल्ला झाल्यास त्यांच्याविरुध्द अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मान्यता दिली आहे. या कायद्याचा वापर करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची शिष्टमंडळाने शनिवारी भेट घेऊन ही मागणी केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार आदीचा त्यामध्ये समावेश होता. पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक पैठणकर यांच्या युनिटवर तीस जणांच्या गटाने केलेला हल्ला, डोंगरी येथील पोलीस हल्ला अशा अनेक घटना घडल्या असून ही बाब पोलीस दलाचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे. राज्यात आतापर्यंत तीन पोलिस शिपायांनी कोव्हीड-१९ विरुद्धच्या युध्दात स्वतःचा जीव गमवला आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी नागरीक अडकून पडले आहेत, त्यांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक असून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे, मात्र अनेक अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात यावी, विविध शासकीय विभागात समन्वय वाढवण्याची आवश्यकता आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरीकांना स्वगृही जाण्यासाठी प्रवासाची परवानगी शासनाने नुकतीच दिली आहे, तसेच केंद्रिय गृह मंत्रालयानेही मजुरांच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन त्याचेही नियोजन करावे, जेणेकरुन बांद्रासारखी परिस्थिती उद्भवणार नाही. यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशी मागणीही करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले.