रेल्वे स्थानकांलगत असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा
By Admin | Published: April 1, 2017 06:37 AM2017-04-01T06:37:25+5:302017-04-01T06:37:25+5:30
रेल्वे हद्दीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अनधिकृत फेरीवाल्यांचा वेढा प्रवेशद्वाराजवळ असतो. त्यामुळे प्रवाशांना
मुंबई : रेल्वे हद्दीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अनधिकृत फेरीवाल्यांचा वेढा प्रवेशद्वाराजवळ असतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे असतानाच, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांवर लोखंडी तुकडे व स्फोटक पदार्थ ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न नुकताच करण्यात आला. त्यानंतर, खबरदारीचे उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडून स्थानक हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची सूचना आरपीएफना (रेल्वे सुरक्षा दल) करण्यात आली. या सर्व बाबी पाहता, पश्चिम रेल्वे आरपीएफकडून मुंबईसह वसई-विरार, मिरा-भार्इंदर पालिका आयुक्तांना पत्रच पाठवून, रेल्वेला लागूनच असणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रेल्वे रुळांवर लोखंडी तुकडे व स्फोटके ठेवून, घातपात घडवण्याचा प्रयत्न मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी झाला. त्यानंतर, महाराष्ट्र पोलिसांकडूनच खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आणि रुळांची पाहणी करतानाच गस्त घालण्यात यावी, तसेच रुळांना लागून असलेले लोखंडी तुकडेही हटविण्यात यावेत, अशी सूचना करतानाच, रेल्वे स्थानक व हद्दीत अनधिकृत फेरीवाले, भिकारी यांना हटविण्याची सूचनाही केली. त्यानुसार, पश्चिम रेल्वे आरपीएफकडून विशेष मोहिमेंतर्गत २१ मार्चपासून तीन दिवस कारवाईदेखील करण्यात आली. यात १५0 पेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाले पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये पकडण्यात आले, परंतु या कारवाईनंतरही रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यांकडून बस्तान मांडण्यात येत असल्याने, अशा फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उचलण्यासाठी आरपीएफकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
फेरीवाले स्थानकांच्या बाहेरच पालिका हद्दीत व्यवसाय करतात. पालिकेकडून कारवाईचा बडगा उचलताच, हेच फेरीवाले रेल्वे हद्दीत प्रवेश करतात. त्यामुळे पालिकेच्या कारवाईपासून पळ काढतात, तर आरपीएफ कारवाईसाठी आल्यानंतर पुन्हा पालिका हद्दीत जाऊन व्यवसाय करतात. (प्रतिनिधी)
रेल्वे हद्दीला लागूनच असणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही लेखी पत्राद्वारे तीन पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे परिसर आणि पालिका यांच्यातील हद्दही स्पष्टपणे ठरलेली नसून, त्यामुळे कारवाईचा गोंधळ उडतो. ती हद्ददेखील स्पष्ट असावी, अशी मागणी आहे.
- अनुप शुक्ला, पश्चिम रेल्वे आरपीएफ-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त