आगीशी खेळ करणाऱ्या नऊ हजार ठिकाणी कारवाई; मुंबईतील ३२ आस्थापने सील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:17 AM2018-12-29T07:17:44+5:302018-12-29T07:18:01+5:30

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर झोप उडालेल्या महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व उपाहारगृहो, मॉल्स, इमारती, तळघरांंची कसून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.

 Take action in nine thousand places of fire; 32 establishments sealed in Mumbai | आगीशी खेळ करणाऱ्या नऊ हजार ठिकाणी कारवाई; मुंबईतील ३२ आस्थापने सील

आगीशी खेळ करणाऱ्या नऊ हजार ठिकाणी कारवाई; मुंबईतील ३२ आस्थापने सील

Next

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर झोप उडालेल्या महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व उपाहारगृहो, मॉल्स, इमारती, तळघरांंची कसून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. या कारवाईअंतर्गत आग प्रतिबंधक नियम गुंडाळून आगीशी खेळ करणाºया नऊ हजार ४०७ प्रकरणांत कायदेशीर कारवाई करण्यात आली. यापैकी ३२ ठिकाणे सील तर १८ प्रकरणी परवाना रद्द करण्यात आला.
गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री कमला मिल कम्पाउंडमध्ये मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन पबला भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद देशपातळीवर उमटले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीत कमला मिलमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळून आले. त्यामुळे जानेवारी २०१८ पासून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईत सर्व उपाहारगृहे, मॉल्स आणि इमारतींच्या पाहणीचे आदेश अग्निशमन दलाला दिले.
अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीत आग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणाºया १७ हजार ७३० प्रकरणी नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र या नोटिशींनंतरही अपेक्षित बदल न करणाºया नऊ हजार ४०७ प्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. यापैकी नऊ हजार ३८२ प्रकरणी मुंबई महापालिका अधिनियम कलम ३९४ तसेच मुंबई अग्निशमन दलाद्वारे ‘अग्नी प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६’नुसार २५ प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
त्यानंतर झाडाझडती
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात साकीनाका येथील फरसाणाच्या दुकानाला आग लागून १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काहीच दिवसांत कमला मिल कम्पाउंडमध्ये दुर्घटना घडली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने उपाहारगृहे, बेकरी, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, तळघर व इमारतीमध्ये पाहणी करून कारवाई सुरू केली. मात्र, तरीही आगीचे सत्र सुरूच आहे.

जानेवारी ते
डिसेंबर २०१८
एकूण तपासणी - ३२ हजार ६१५
नोटीस - १७ हजार ७३०
कायदेशीर कारवाईची प्रक्रिया - ९ हजार ४०७
जप्तीची कारवाई - २ हजार १०७
सील - ३२
परवाना रद्द -१८

या विभागांमध्ये नियम मोडणाºया आस्थापनांना टाळे
कुलाबा - १, मोहम्मद अली रोड - ४, ग्रँटरोड - १, दादर, परळ - ५, खार - २, वांद्रे - ३, अंधेरी पूर्व - २, कुर्ला - ३, चेंबूर प. - ४, घाटकोपर - २, भांडुप - ५.
यांचे परवाना रद्द
घाटकोपर - १५ व दादर, परळ येथे तीन आस्थापनांचे परवाने रद्द.

अशी होते तपासणी..

व्यावसायिक व निवासी इमारती, हॉटेल्स, उपाहारगृहे, टी सेंटर, बेकरी, कॅटरिंग सेवा, अन्नपदार्थ शिजविण्याची ठिकाणे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स, तळघर येथे अग्निसुरक्षा विषयक तपासणी करण्यात येते. या तपासण्या मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते, अतिक्रमण निर्मूलन खाते व महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागातील संबंधित यंत्रणांद्वारे करण्यात येत आहेत.

Web Title:  Take action in nine thousand places of fire; 32 establishments sealed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग